सांगली - दिल्लीतील कृषी आंदोलनाला पाठिंबा म्हणून भारत बंदची हाक देण्यात आली आहे. सांगली जिल्ह्यामध्ये भारत बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी आंदोलनात उत्स्फूर्त सहभाग घेतला आहे.
केंद्र सरकारच्या कृषी कायद्याच्या विरोधात दिल्लीतील शेतकऱ्यांचे मागील काही दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी विविध राजकीय संघटनांनी देखील कंबर कसली आहे. सांगली जिल्ह्यामध्ये या भारत बंदला मोठा प्रतिसाद मिळत आहे. सकाळपासून सांगली शहरासह ग्रामीण भागातील सर्व व्यापार, बाजार समित्या आणि व्यवहार ठप्प आहेत.
वाहतूक सेवा वगळता सर्व व्यवसाय बंद आहेत. सांगली महापालिका क्षेत्रातील सर्व व्यापाऱ्यांनी, उद्योजकांनी या बंदमध्ये सहभाग घेतला आहे. आपले दुकान आणि व्यवसाय बंद ठेऊन शेतकर्यांच्या कृषी कायद्याविरोधातील आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. सांगली शहरातल्या गणपती पेठ,सराफ कट्टा, कापड पेठ, स्टेशन रोड अशा प्रमुख बाजारपेठांमध्ये कडकडीत बंद आहे. तसेच ग्रामीण भागातही भारत बंदला चांगला पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आंदोलनात जिल्ह्यातील नागरिक उस्फूर्तपणे सहभागी झाले आहेत.