सांगली - सांगली शहरात बिबट्या शिरल्याने खळबळ उडाली आहे. राजवाडा चौक याठिकाणी हा बिबट्या दबा धरून बसला असून त्याला जरेबंद करण्यासाठी वन विभागाकडून प्रयत्न सुरू असून कोल्हापूरहून या बिबट्याला पकडण्यासाठी बेशुद्ध करणाऱ्या बंदुकीसह विशेष पथक दाखल झाले आहे.
बंदुकीसह पथक दाखल
सांगली शहरांमध्ये मध्यवर्ती वस्तीत बिबट्या घुसला आहे. पहाटेच्या सुमारास हा बिबट्या शहरात दाखल झाला असून सकाळी राजवाडा चौक या ठिकाणी बिबट्याचे दर्शन झाला आहे, तर या ठिकाणी पालिकेच्या असणाऱ्या व्यापारी संकुलामध्ये बिबट्याकडून कुत्र्याला ठार करण्यात आल्याची बाब निदर्शनास आली. या ठिकाणी बिबट्याचे ठसे आढळून आले आहेत, त्यानंतर या बिबट्याने रस्त्याच्या पलिकडे एका इमारतीच्या मागील बाजूस जाऊन दबा धरल्याचे समोर आले. त्याठिकाणी वनविभाग,पोलीस प्रशासन आणि महापालिकेच्या अग्निशामक विभागाच्यावतीने रेस्क्यू ऑपरेशन सुरू करत बिबट्याला जेरबंद करण्याचे मोहीम चालू करण्यात आली आहे. तसेच सर्व परिसरात पोलिसांकडून नाकेबंदी करण्यात आली असून या बिबट्याला पकडण्यासाठी कोल्हापूरहून विशेष पथक सांगलीत दाखल झाले आहे. बेशुद्ध करणाऱ्या बंदुकीसह 4 जणांचे पथक आणि प्राणिमित्र बिबट्याचा शोध घेऊन जेरबंद करण्याचा प्रयत्न करत आहेत.
3 वर्षांचा बिबट्या, काळजी घ्या
घटनास्थळी सापडलेले ठसे यावरून हा तीन वर्षाचा बिबट्या असून त्याला जेरबंद करण्यासाठी वनविभाग प्रयत्न करत आहे. तर बिबट्याला पकडताना नागरिकांची होणारी मोठी गर्दी अडथळा ठरत असल्याने राजवाडा चौक याठिकाणी 144 कलम पोलिसांनी लागू केले आहे, सांगलीकर नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन वन अधिकारी प्रमोद धानके यांनी केले आहे.