सांगली - केंद्र अथवा राज्याच्या तपास यंत्रणांनी प्रसारमाध्यमांसमोर चमकोगिरी करणे टाळावे, असे मत विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केले आहे. राजकीय नेत्यांकडून तपास यंत्रणेवर प्रश्न चिन्ह उपस्थित करणे हे अत्यंत वाईट आहे. त्यामुळे कायदा-सुव्यवस्थेला धोका निर्माण होऊ शकतो, असे ते म्हणाले. ते सांगलीमध्ये बोलत होते.
हेही वाचा - ईडी-सीबीआयच्या कारवाईवर रोहित पवारांचा गौप्यस्फोट; वाचा, नेमके काय म्हणाले...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे कौतुक
सांगलीमध्ये जिल्हा सत्र न्यायालयात जिल्हा वकील संघटनेकडून विशेष सरकार वकील उज्ज्वल निकम यांचा मुंबई रत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार पार पडला. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमादरम्यान त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुन्हा घडताच कामा नये आणि लोकांना न्यायालयात जावेच लागू नये, या विधानाचे स्वागत केले आहे. मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य स्तुत्य असल्याचे मत व्यक्त करत मनुष्य स्वभावाप्रमाणे आपल्या मनासारखे झाले नाही, तर याची कुठे दाद मागायची हा देखील महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे न्यायालये असली पाहिजेत, मात्र न्यायालयात अकारण कुणाला त्रास, बदला घेण्याच्या हेतूने कायदेशीर कारवाई नसावी. हाच यामागे मुख्यमंत्र्यांचा उदात्त हेतू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
हेही वाचा - ईडी, सीबीआय अन् आयकर विभागाचा गैरवापर एकदिवस तुमच्यावरच बुमरँग होईल, भुजबळांचा भाजपला इशारा
'कायदा व सुव्यवस्थेसाठी घातक'
तपास यंत्रणेच्या बाबतीत उपस्थित केल्या जाणाऱया प्रश्नांबाबत बोलताना निकम म्हणाले, की राज्य असेल किंवा केंद्राच्या तपास यंत्रणेच्या तपासबाबत काही मते व्यक्त करण्यात येत आहेत. हे देशातील कायदा व सुव्यवस्थेसाठी अत्यंत वाईट आहे. एखाद्या तपास यंत्रणेने तपास करताना अत्यंत संयम बाळगला पाहिजे. उगीच चमकोगिरी म्हणून वाट्टेल ती निवेदने आणि सोशल मीडियावरील प्रसिद्धी टाळायला हवी. तुमच्या कृत्यामुळे राजकीय नेते टीका करायला परावृत्त होणार नाहीत, याची काळजी घेतली पाहिजे, असे ते म्हणाले.