सांगली - सांगलीच्या भाजीपाला बाजारात सोशल डिस्टन्सिंगचे तीन तेरा वाजताना पहायला मिळत आहे. भाजीपाला विक्रेते, नागरिकांची तोबा गर्दी सांगलीतील विष्णुअण्णा भाजीपाला मार्केटमध्ये झाली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभर लॉकडाऊन आहे. तसेच राज्यात कडकडीत संचारबंदी आहे. प्रशासनाकडून नागरिकांना गर्दी टाळा, सोशल डिस्टन्सिंग पाळा असे वारंवार आवाहन केले जात आहे. तरिही नागरिक कोणत्या ना कोणत्या कारणाने गर्दी करत आहेत आणि सोशल डिस्टन्सिंग पाळत नसल्याचे पहायला मिळत आहे.
हेही वाचा... समाजात तेढ निर्माण करणारे व्हिडिओ 'टिक-टॉक'वर नको; नाशिक पोलिसांची व्यवस्थापनाला नोटीस
सांगली पोलिसांकडून आणि प्रशासनाकडून गर्दी करणार्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येत आहे. मात्र, शुक्रवारी सांगलीच्या कोल्हापूररोड जवळील विष्णूअण्णा पाटील भाजीपाला व फळे मार्केटमध्ये खरेदी-विक्रीसाठी भाजीपाला विक्रेत्यांबरोबर नागरिकांची तोबा गर्दी पहायला मिळाली. वास्तविक या मार्केटमध्ये फळे आणि इतर भाजीपाल्यांचा लिलाव पार पाडतो. यामध्ये शेतकरी, व्यापारी, भाजीपाला विक्रेते यांचीच उपस्थिती असणे अपेक्षित होतं. मात्र, याठिकाणी नागरिकांनी देखील थेट भाजीपाला खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी केली होती.
सांगली महापालिका प्रशासनाने अत्यावश्यक सेवा घरपोच त्याचबरोबर प्रत्येक प्रभागानुसार भाजीपाला विक्री सेवासुद्धा सुरू केली आहे. मात्र, असे असतानाही नागरिक शहराबाहेर असणाऱ्या मार्केटमध्ये किरकोळ भाजीपाला खरेदी करण्यासाठी गर्दी करत आहेत।