सांगली - जिल्ह्यातील मिरज शहरातील रामकृष्ण कंपनीचा चेक चोरून त्याद्वारे कंपनीच्या खात्यातील 20 लाख रुपये चोरी केल्याप्रकरणी मीरज येथील शिवसेना शहरप्रमुखाला अटक करण्यात आली आहे. चंद्रकांत मैंगुरे असे या शहर प्रमुखाचे नाव आहे. त्यांच्यावर येथील महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चेक चोरून वटवले 20 लाख -
चंद्रकांत मैंगुरे यांच्या विरोधात महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात वीस लाख रुपयांची चोरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. मिरज शहरातील रामकृष्ण कंपनीचा एका चेकबुकमधून मैंगुरे यांनी आपल्या साथीदारासमवेत एक चेक चोरला. त्या चेकवर 20 लाख रुपयांची रक्कम टाकून तो बँकेमधून आपल्या खात्यात वर्ग करत त्यातील पैसे खर्च केले आहेत, अशी तक्रार रामकृष्ण कंपनीकडून महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात दाखल केली होती. त्यावरून मिरज शिवसेना शहरप्रमुख चंद्रकांत मैंगुरे यांना पोलिसांनी अटक केली आहे.
चार दिवसांची पोलीस कोठडी -
मैंगुरे यांनी गुन्हा दाखल झाल्यावर अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला होता. मात्र न्यायालयाने मैंगुरे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. त्यानंतर गुरुवारी रात्री उशिरा महात्मा गांधी चौक पोलिसांनी चंद्रकांत मैंगुरे याला अटक करत शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता, मिरज न्यायालयाने चंद्रकांत मैंगुरे याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान शिवसेना शहरप्रमुखाच्या अटकेनंतर मिरज शहरामध्ये राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.