सांगली - वाढती महागाई, इंधन दरवाढीविरोधात शिवसेनेकडून प्रतिकात्मक तिरडी मोर्चा काढत केंद्र सरकारचा निषेध नोंदवण्यात आला. भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी शेतकरी आंदोलनाबाबत केलेल्या वक्तव्याचाही निषेध करण्यात आला.
शहरातील स्थानक चौकात शिवसैनिकांच्या वतीने महागाईचा निषेध म्हणून तिरडी मोर्चा काढला. यावेळी दरवाढीच्या विरोधात शंखध्वनी करत केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. पेट्रोल 50 रुपये आणि डिझेल 40 रुपये प्रति लिटर मिळावे, त्याचबरोबर गॅस अनुदान वाढवून आणि रेशन कार्डवरील रॉकेल तेल पुन्हा मिळावे, अशी मागणी करण्यात आली.
रावसाहेब दानवेंचाही नोंदवला निषेध
भाजपचे नेते खासदार रावसाहेब दानवे यांनी दिल्लीतील शेतकरी आंदोलनवरून टीका करताना शेतकरी आंदोलनात चीन व पाकिस्तान देशाचा हात असल्याचे वक्तव्य केले होते. शिवसेनेकडून याचा निषेध नोंदवला. यावेळी संतप्त शिवसैनिकांनी खासदार रावसाहेब दानवे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत भाजपने त्यांची पक्षातून हकालपट्टी करावी, अशी मागणीही केली आहे.