सांगली - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान कोरोना रुग्ण आणि नातेवाईक यांच्यासाठी पुढे आले आहे. शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तानच्यावतीने गरजू कोरोना रुग्णांना मोफत प्राणवायू देण्याबरोबर उपचार घेणाऱ्या कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांना भोजन उपलब्ध करून देण्यात येत आहे.
सध्याच्या कोरोनाच्या स्थितीमध्ये ऑक्सिजन अभावी कोरोना रुग्णांचा मृत्यू होत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी बेड आणि ऑक्सीजनचा मोठा तुटवडा असल्याने ही परिस्थिती उद्भवत आहे. अनेक हॉस्पिटलमध्ये लॉकडाउनमुळे कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांचे जेवणाचा प्रश्न निर्माण होत आहेत. ही बाब लक्षात घेऊन सामाजिक बांधिलकी म्हणून सांगलीमध्ये श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तान संघटना या परिस्थितीमध्ये मदतीसाठी पुढे आली आहे. ज्या रुग्णांना ऑक्सिजन बेड मिळत नाहीत. त्यांना किमान घरी राहून प्राण वाचवण्यासाठी मोफत ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध करून देत आहेत. तसेच, जे रुग्ण कोरोना रुग्णालयात उपचार घेत आहेत, अशा रुग्णांच्या नातेवाईकांना मोफत भोजन सेवा सुरु केली आहे. सध्या 15 ऑक्सिजन सिलिंडरच्या माध्यमातून ही सेवा पुरवण्यात येणार आहे. भविष्यात 50 ते 60 ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध होतील,असा विश्वास शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नितीन चौगुले यांनी व्यक्त केला आहे. सोमवारी त्यांच्या उपस्थितीत या सेवेचा शुभारंभ झाला आहे.