सांगली - पुण्यात कोरोनाग्रस्तांचा वाढता आकडा लक्षात घेता 13 जुलै ते 23 जुलै पुन्हा टाळेबंदी करण्यात येत आहे. या टाळेबंदीस पुण्यातील व्यापाऱ्यांनी विरोधा दर्शवला असून या विरोधाचे शेतकरी संघटनेने समर्थन केले आहे. व्यापाऱ्यांचा विरोध योग्य असून शेतकरी संघटना पुर्णपणे व्यापाऱ्यांच्या पाठीशी असल्याचे संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी जाहीर केले आहे. राज्य सरकारने टाळेबंदी करण्याऐवजी इतर उपाययोजनांवर विशेष लक्ष द्यावे व देशातील नागरिकांनीही यापुढे टाळेबंदीला विरोध करावा, असे आवाहन रघुनाथदादा पाटील यांनी केले आहे. ते सांगलीच्या साखराळे येथे बोलत होते.
पुणे शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य सरकार व जिल्हा प्रशासनाने पुणे, पिंपरी-चिंचवड व त्याला लागून असलेल्या गावांमध्ये सोमवारपासून (दि.13 जुलै) 23 जुलैपर्यंत टाळेबंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, याला पुणे शहरातील व्यापाऱ्यांनी विरोध दर्शवला आहे. व्यापार बंद हा कोरोनावरील उपाय नसल्याचे स्पष्ट करत आर्थिक अडचणीत असणाऱ्या व्यापाऱ्यांनी टाळेबंदी मान्य नसल्याचे स्पष्ट करत विरोध जाहीर केला आहे.
तर व्यापाऱ्यांच्या भूमिकेचे शेतकरी संघटनेने समर्थन केले आहे. शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी व्यापाऱ्यांनी टाळेबंदीला केलेले विरोध योग्य असल्याचे मत व्यक्त केले असून पुण्यातील व्यापाऱ्यांना शेतकरी संघटनेचे पाठिंबा असल्याचे रघुनाथदादा पाटील यांनी जाहीर केले आहे. टाळेबंदी करुन, व्यापार बंद ठेवून कोरोना गेला आहे का ? तो वाढतच चालला आहे. त्यामुळे टाळेबंदी हा कोरोनावरचा उपाय नाही. देशातील सर्वात मोठी झोपडपट्टी असणाऱ्या मुंबई मधील धारावीत टाळेबंदी न करता कोरोनावर ज्या पध्दतीने नियंत्रण आणले त्याच पद्धतीने उपाय केला पाहिजे, असे मत रघुनाथदादा पाटील यांनी स्पष्ट केले.
यापुढे टाळेबंदी कोणालाही न परवडणारे आहे. त्यामुळे पुणे येथील व्यापाऱ्यांनी घेतलेली भूमिका योग्य असून आपण या व्यापाऱ्यांचे अभिनंदन करतो आणि त्यांना आपला पाठिंबा देत असल्याचे पाटील यांनी जाहीर करत, यापुढे नागरिकांनाही टाळेबंदी विरोधाची भूमिका घ्यावी, असे आवाहनही रघुनाथदादा पाटील यांनी केले आहे.
हेही वाचा - सांगली महापालिकेच्या निवारा केंद्रातील एकास कोरोनाची लागण..