सांगली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शरद पवारांची आठवण येत आहे, पण माझी आता जाहिरात करण्यासारखी परिस्थिती नाही, पण मोदी आपल्या भाषणातून टीका करून विना पैशाची माझी जाहिरात करत आहेत हे चांगलेच आहे, असे खोचक मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी व्यक्त केले. ज्यांना घर नाही, त्यांना माझ्या घराची चिंता का वाटतेय? असा टोला पवारांनी मोदींना लगावला आहे. सांगली जिल्ह्यातील तासगावमध्ये आयोजित महाआघाडीच्या प्रचार सभेत ते बोलत होते.
सांगली लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस महाआघाडी मित्र पक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार विशाल पाटील यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी तासगावमध्ये सभा पार पडली. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार सुमनताई पाटील, स्वाभिमानीचे खासदार राजू शेट्टी, सांगलीचे स्वाभिमानीचे उमेदवार विशाल पाटील यांच्यासह राष्ट्रवादी, स्वाभिमानी आणि काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी बोलताना राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी भाजप आणि नरेंद्र मोदींच्यावर जोरदार निशाणा साधला.
नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात आत्तापर्यंत ६ सभा झाल्या. या सहाही सभेत मोदी यांनी माझ्यावर टीका केली, पत्रकारांनी याबाबत मला विचारले तुमचे काय उत्तर आहे, पण मी सांगितले की, काही नाही, आज जाहिरात करायची झाली तर पैसे लागतात. मात्र, मोदी माझी विना पैशाची जाहिरात करत आहेत, हे चांगलेच आहे, असे म्हणत पवार यांनी मोदींना टोला लगावला.
शेतकऱ्यांना साले म्हणणारे आणि त्याच्या मुलांना लावारीस म्हणणाऱ्यांना आता मते मागायला येताना शरम तरी कशी वाटत नाही. भाजपवाल्यांना सत्तेचा माज आलाय, असा त्यांनी हल्ला चढवला. ज्याला स्वतःचे घर सांभळता येत नाही, त्यांना माझ्या घराची का चिंता वाटते, असा टोलाही पवार यांनी लगावला.
सर्जिकल स्ट्राईकनंतर पाकिस्तानच्या ताब्यातून पायलट अभिनंदनची सुटका ही जगाच्या दबावामुळे झाली, पण माझ्या ५६ इंच छातीमुळे झाली, असे मोदी सांगतात. मग ३ वर्षांपासून कुलभूषण पाकिस्तानाच्या तुरुंगात आहे, त्यावेळी तुमची छाती १५ इंच होते काय? असा सवालही पवार यांनी मोदींना विचारला.
नोटबंदीनंतर मला काळा पैसा बाहेर काढण्यासाठी १०० दिवस द्या, असे मोदी म्हणाले. मात्र, काळा पैसा काही दिसला नाही. काळा पैसा बाहेर आला नाही, तर मला चौकात फाशी द्या, असे मोदी म्हणाले होते. आता कोणता चौक शोधायचा मला सांगा, त्यांना फाशी द्यायच्या नादात पडू नका, मते टाकून या मोदींना धडा शिकवा, असे आवाहन पवारांनी जनतेला केले. शेतकरी आत्महत्या करतात याचे उत्तर शरद पवारांनी द्यावे, अशी मोदी मागणी करत आहेत, पण ५ वर्षांपासून सत्तेच्या चाव्या यांच्याकडे आहेत असेही पवार म्हणाले.