सांगली - वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिका क्षेत्रातील मिरज, सांगली आणि कुपवाड याठिकाणी सात दिवसांचा जनता कर्फ्यु जाहीर करण्यात आला आहे. बुधवार 5 मेपासून 11 मेपर्यंत सात दिवसांचा हा जनता कर्फ्यु असणार आहे. मनपातील सर्वपक्षीय नेते आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती महापौर दिग्विजय सुर्यवंशी यांनी दिली.
सात दिवसांच्या जनता कर्फ्युची घोषणा -
सांगली महानगरपालिका क्षेत्रात दिवसेंदिवस कोरोना रुग्ण संख्येत वाढ होत आहे. लॉकडाऊन असतानाही अनेक लोक विनाकारण रस्त्यावर फिरत असल्याने कोरोनाला ब्रेक लावणे अवघड झाले आहे. अशा स्थितीमध्ये निर्बंध अधिक कडक करण्याच्यादृष्टीने सांगली महापालिकेच्यावतीने कर्फ्यूचे पाऊल उचलण्यात आले आहे. महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली महापालिका कार्यालयात पालिकेचे सर्व पक्षीय नगरसेवक, राजकीय पक्षाचे नेते आणि व्यापारी यांची संयुक्त बैठक पार पडली. ज्यामध्ये पालिका क्षेत्रातील वाढती कोरोना रुग्णसंख्या रोखण्यासाठी सात दिवसांचा जनता कर्फ्यु पाळण्याचा निर्णय घेण्यात आला. या जनता कर्फ्यु दरम्यान दूध, मेडिकल व वैद्यकीय सेवा वगळता सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे आवाहन महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी सांगलीकर जनतेला केले आहे.
राज्यातील रुग्णसंख्येत किंचित घट -
राज्यात सोमवारी 48 हजार 621 रुग्णांची नोंद झाल्याने, कोरोनाबाधितांचा एकूण आकडा हा 47 लाख 71 हजार 022 पोहोचला आहे. गेल्या 24 तासांमध्ये 59 हजार 500 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने कोरोनामुक्तांची एकूण संख्या 40 लाख 41 हजार 158 वर पोहचली आहे. तर, दिवसभरात 567 रुग्णांचा मृत्यू झाला. हा मृत्यूदर 1.49 टक्के एवढा आहे. सध्या राज्यात 6 लाख 56 हजार 870 रुग्ण सक्रिय आहेत.