सांगली - कृषी कायद्याच्या समर्थनार्थ रयत क्रांती संघटना आणि भाजपकडून किसान आत्मनिर्भर यात्रेची घोषणा सोमवारी सांगली मधून माजी कृषी राज्यमंत्री आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी केली. 24 डिसेंबर पासून क्रांतीसिह नाना पाटील यांच्या सांगलीच्या किल्ले मच्छिंद्रगड गावामधून भाजपा नेते आशिष शेलार यांच्या उपस्थितीत या यात्रेस सुरुवात होणार असल्याचे आमदार खोत यांनी स्पष्ट केले. सांगलीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
कृषी कायद्याला विरोध करणारे बांडगुळ -
6 टप्पे हे यात्रेचे असून,पहिल्या टप्प्यात सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात 4 दिवसांची यात्रा असणार आहे. 27 डिसेंम्बरला सांगलीच्या पेठ या ठिकाणी पहिल्या टप्प्यातील यात्रेचा समारोप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार आहे. त्यानंतर मराठवाडा, विदर्भ असे संपूर्ण राज्यात ही यात्रा पुढील टप्प्यात असणार आहेत. कृषी कायद्या बाबत शेतकरयांच्या मध्ये जागृती करण्यात येणार असल्याचे आमदार खोत यांनी स्पष्ट केले आहे. यावेळी खोत यांनी कृषी कायद्याला विरोध करणाऱयांना बांडगुळ असल्याचे टीका करत काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा विरोध म्हणजे मगरीचे अश्रू असल्याचा टोलाही लगावला.