सांगली - आमचा संग पहिला आहे, आता जंग पहा. तसेच आधी मैदानात या, मग सगळाच समाचार घेतो, असा इशारा संजयकाका पाटील यांनी वसंतदादा पाटील घराण्याला दिला आहे. तर दुसऱ्या बाजूला भाजप जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुखांनी जिल्ह्यात येत्या २ दिवसात राजकीय सर्जिकल स्ट्राईक होणार असल्याची माहिती दिली.
लोकसभा निवडणूक प्रचाराला भाजपकडून सुरुवात करण्यात आली आहे. आज सांगलीमध्ये निवडणूक प्रचार नियोजनासाठी भाजपकडून महापालिका क्षेत्रातील कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. लोकसभेचे उमेदवार संजयकाका पाटील यांच्यासह भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, आमदार सुधीरदादा गाडगीळ, आमदार सुरेश खाडे यांच्यासह भाजपचे प्रमुख नेते आणि महापालिका क्षेत्रातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते.
यावेळी सर्वच नेत्यांनी बोलताना ५ वर्षात मोदी सरकारने देशात आणि पाटील यांनी जिल्ह्यात विकासकामांचा डोंगर उभा केला आहे. त्यामुळे मतदारसंघात भाजपचा विजय निश्चित आहे. पाटील यांना अधिक मताधिक्य कसे मिळेल, यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागले पाहिजे, असे आवाहन करण्यात आले. तसेच आज भाजपसमोर काँग्रेसला उमेदवार सुद्धा मिळणे कठिण बनले आहे. यातच भाजपचा विजय असल्याचे मत अनेक नेत्यांनी व्यक्त केले.
देशमुख म्हणाले, जिल्ह्यातील भाजपमधील असणारे सर्व वाद मिटले आहेत. जे काही वाद राहिले आहेत ते सुद्धा लवकरच मिटतील. येत्या २ दिवसात जिल्ह्यात राजकीय सर्जिकल स्ट्राईक होणार आहे, असे भाकित देखील त्यांनी यावेळी केले. तसेच कवठेमंहाकाळ मध्ये पहिली राजकीय स्ट्राईक होईल, अशी माहितीही त्यांनी दिली.
विशाल पाटील यांनी केलेल्या टीकेबाबत बोलताना संजयकाका म्हणाले, आत्ताच आपण या टीकेचा समाचार घेणार नाही. पण आमचा संग पहिला आहे, आता जंग पहा आणि बाळुत्या असल्यापासून तुम्हाला पाहिले आहे, असे सांगत आधी मैदानात या, मग सगळा समाचार घेतो. तसेच निवडणूक अर्ज भरल्यावर या सगळ्या टीकेचा समाचार घेण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. आमचे वाद मुख्यमंत्र्यांच्या समोर केवळ ५ मिनिटात मिटले आहेत. हा वाद आपल्या एका रणनीतीचा भाग होता. तसेच त्याचे परिणाम आता दिसतील, असे वक्तव्य त्यांनी यावेळी केले.