सांगली- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सांगलीमध्ये घरो-घरी मोफत सॅनिटायझर वाटप सुरू करण्यात आले आहे. विशाल पाटील युवा प्रतिष्ठानाकडून ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. नगरसेवकांच्या माध्यमातून थेट नागरिकांच्या दारात जाऊन सॅनिटायझरचे वितरण करून कोरोनाबाबत काळजी घ्या, असे आवाहन करण्यात येत आहे.
हेही वाचा- बारामतीतील 'त्या' कोरोनाबाधित व्यक्तीच्या दोन्ही नाती कोरोनाग्रस्त; शहरात एकूण संख्या 6वर
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू व वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विशाल पाटील यांच्या माध्यमातून सॅनिटायझरचे उत्पादन करण्यात आले आहे. त्यांच्या विशाल पाटील युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून नागरिकांना मोफत वितरण करण्यात येत आहे. सांगलीतील शिंदेमळा, सह्याद्रीनगर या प्रभाग क्रमांक 9 मधून आज मोफत सॅनिटायझर वाटप मोहिमेला सुरुवात झाली आहे.
नगरसेवक संतोष पाटील, मनगू आबा सरगर, नगरसेविका रोहिणी पाटील आणि मदिना बारुदवाले,अल्ताफ पेंढारी यांच्या उपस्थितीमध्ये नागरिकांच्या घरा-घरामध्ये जाऊन सॅनिटायझरचे वाटप करण्यात येत आहे. तसेच कोरोना बाबत शासनाकडून देण्यात आलेल्या सूचनांचे पालन करुन, मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करुन कोरोना टाळण्यासाठी आपले कर्तव्य बजावा, असे आवाहन यावेळी करण्यात येत आहे.