सांगली - दहावीच्या परीक्षेत सांगलीच्या समृध्दी जगदाळे या विद्यार्थीनीने 99.40 टक्के गुण मिळवत सांगली केंद्रात अव्वल येण्याचा बहुमान मिळवला आहे. संस्कृत आणि गणितात या विद्यार्थीनीने 100 पैकी 100 गुण मिळवले आहेत. शेतकरी कुटुंबातील असणाऱ्या समृद्धीच्या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.
राज्यातील दहावीचा निकाल आज जाहीर झाला. सांगली केंद्रातील सांगली हायस्कूलमध्ये 90 टक्केहुन अधिक गुण मिळवणारे 18 विद्यार्थी आहेत. त्यामध्ये समृद्धी संजय जगदाळे हिने 500 पैकी 497 म्हणजे 99.40 टक्के गुण मिळवून सांगली केंद्रात प्रथम येण्याचा बहुमान मिळवला आहे. तिच्या या यशाबद्दल सांगली हायस्कूलच्यावतीने समृद्धीचे विशेष अभिनंदन करण्यात आले. यावेळी समृद्धी हिचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. 90 टक्के गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांचाही याप्रसंगी सत्कार करण्यात आला. सांगली हायस्कुलचे चेअरमन प्रमोद पाटील, यांच्या हस्ते हा सत्कार पार पडला. समृद्धी ही मध्यमवर्गीय कुटुंबातुन आहे, वडील संजय जगदाळे हे शेतकरी तर आई गृहणी आहे. चिकाटीने केलेल्या अभ्यासाच्या जोरावर आपण हे यश संपादन करू शकलो आणि या यशामध्ये आपले आई-वडील आणि शाळेच्या शिक्षकांचा मोठा वाटा असल्याचे मत व्यक्त करत त्यांच्याबद्दल समृद्धीने कृतज्ञता व्यक्त केली आहे. तिच्या यशाबद्दल समृद्धीचे सर्वत्र कौतुक होत आहे.