सांगली - मुलीच्या जन्मानंतर अवघ्या काही वेळात जन्मदात्या आईने बाळाचा जीव घेतला. सांगलीच्या शासकीय रुग्णालयात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणी आरोपी मातेवर मुलीच्या खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.
सुमित्रा गंगाप्पा जुट्टी (रा. कर्नाटक) असे या निर्दयी मातेचे नाव आहे. सुमित्रा प्रसूतीसाठी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल झाली होती. शनिवारी तिने एका मुलीला जन्म दिला. मात्र, त्यानंतर काही वेळाने तिने आपल्या नवजात मुलीचा गळा दाबून मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती वार्डमध्ये असणाऱ्या एका महिलेने डॉक्टरांना दिली. डॉक्टरांनी त्या नवजात मुलीची तपासणी केली असता मुलीच्या गळ्यावर व्रण आढळले. रुग्णालय प्रशासनाकडून त्या मुलीवर तत्काळ उपचार सुरू करण्यात आले. मात्र, रविवारी रात्री नवजात मुलीचा मृत्यू झाला.
अवघ्या काही तासांपूर्वी जन्मलेल्या मुलीचा तिच्या आईनेच गळा आवळून खून केल्याने रुग्णालय हादरून गेले आहे. या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात सुमित्रा जुट्टीवर स्वतःच्या मुलीचा खून केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुमित्राने असे का केले, याचे उत्तर अद्याप गुलदस्त्यातच आहे.