सांगली - महापालिकेतील सत्ताधारी भाजप विरुद्ध आयुक्त वाद विकोपाला जावून अखेर आयुक्त रवींद्र खेबुडकर यांची बदली करण्यात आली आहे. सोमवारी सामाजिक न्याय मंत्री सुरेश खाडे आणि सांगलीचे आमदार यांच्यासह महापौर आणि भाजप पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांकडे आयुक्तांच्या बदलीची मागणी केली होती. आता खेबुडकर यांची बदली करत त्यांच्या जागी नागपूर महापालिकेचे उपायुक्त नितीन कापडणीस यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेतील विकास कामांवरून सत्ताधारी भाजप आणि महापालिका आयुक्त रवींद्र खेबुडकर यांच्यात काही महिन्यांपासून वाद सुरू होता. तर आयुक्तांकडून मनमानी कारभार करण्यात येत असल्याचा आरोप करत भाजप नगरसेवकांनी 'आयुक्त हटाव मोहीम' हाती घेतली होती. यामधूनच आयुक्त रवींद्र खेबुडकर आणि महापालिकेतील सत्ताधारी भाजपमध्ये जोरदार संघर्ष निर्माण झाला होता.
नुकतेच खेबुडकर यांचा कार्यकाळ पूर्ण होऊन त्यांना 1 वर्षाची बढती देण्यात आली होती. मात्र, त्यांच्याकडून सांगली महापालिकेच्या विकासामध्ये खोडा घालण्यात येत असल्याचा आरोप भाजप पदाधिकाऱ्यांनी केला होता. 4 दिवसांपूर्वी भाजपच्या सर्व पदाधिकारी आणि आमदारांनी आयुक्त रवींद्र खेबुडकर यांच्या बदलीची जाहीर मागणी केली होती.
खेबुडकर यांची महसूल, वन विभाग मंत्रालयात बदली करण्यात आली आहे. राज्यपाल कार्यालयाकडून हा आदेश पारित झाला. तर बुधवारी नुतन आयुक्त नितीन कापडणीस हे सांगली महापालिकेचा पदभार स्वीकारणार आहेत. कापडणीस यांनी 4 वर्षांपूर्वी सांगली महापालिका उपायुक्त म्हणून काम पाहिले आहे.