सांगली - कृष्णा नदीच्या महापुराने सांगलीतील बाजारपेठ उद्ध्वस्त झाली आहे. पुराच्या पाण्यात संपूर्ण व्यापार बुडाला आहे. सध्या पूर ओसरला असून 10 दिवसांनी व्यापारी आपल्या दुकानात आले आहेत. बाजारपेठेत अत्यंत विदारक चित्र व्यापाऱ्यांना पहायला मिळत आहे. सुमारे 10 ते 15 हजार कोटींच्या आसपास नुकसान झाल्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
दुकानात असणारे सर्व साहित्य भिजून वाया गेले आहे. या पुरात सराफ कट्टा, कापड पेठ, हरभट रोड, मारुती चौक, गणेश मार्केट, गणपती पेठ, पटेल चौक अशी सांगलीची सर्व बाजार पेठ पाण्यात गेली. तर या संकटातून व्यापाऱ्यांना आणि सांगलीची बाजारपेठ उभी करण्यासाठी सरकारने सढळ हाताने मदत केली पाहिजे. व्यापाऱ्यांच्या कर्जाचे व्याज माफ करावे, एका वर्षासाठी टॅक्स माफ करावा, तातडीने कमी व्याज दरात कर्ज उपलब्ध करावे, अशी मागणी व्यापारी एकता असोसिएशनचे अध्यक्ष समीर शहा यांनी केली आहे. सरकारने तत्काळ मदत देण्याची भूमिका घेतली नाही, तर याच बाजार पेठेत व्यापारी आत्महत्या करतील, असा इशाराही त्यांनी दिला.