सांगली - लोकसभेच्या काँगेस उमेदवारीच्या वादानंतर निर्माण झालेला जागेचा प्रश्न मिटता-मिटेना. स्वाभिमानाच्या वाट्याला जागा जाणार की? काँग्रेसचा उमेदवार मैदानात उतरणार? याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या उत्सुकतेपोटी सोशल मीडियावर फक्त 'फायनल झालं का' अशी चर्चा रंगली आहे.
सांगली लोकसभेसाठी भाजपकडून विद्यमान खासदार संजयकाका पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, काँग्रेस मधला तिढा अद्याप सुटला नाही. काँग्रेसमधून कोण लढणार याबाबत प्रश्न निर्माण झाल्याने, सांगलीची जागा काँग्रेस आघाडीचे मित्रपक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वाट्याला गेल्याच्या चर्चेला उधाण आले. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आपल्यालाच सांगलीची जागा मिळाली आहे, अशी चर्चा करत आहेत. तर काँग्रेस नेते जाहीरपणे जागा काँग्रेसकडे राहील अशी आणि खासगीत स्वाभिमानीकडे जागा जाणार ही भाषा करत आहेत. यामुळे रोज उठणाऱया वेगवेगळ्या अफवांनी सांगलीच्या जागेचा गुंता अधिक वाढला आहे.
जिल्ह्यातील काँग्रेस, राष्ट्रवादीपासून भाजपच्या नव्हे तर सर्व पक्षातील कार्यकर्त्यांना आणि सर्वसामान्य जनतेला काँग्रेसला जागा मिळणार की, स्वाभिमानीला? आणि मिळाल्यास उमेदवार कोण? याबाबत उत्सुकता लागून राहिली आहे. शहरातील गल्लीबोळापासून चहाच्या टपरीवर आणि सोशल मीडियावर सांगलीच्या निवडणुकीबाबत चर्चा सुरू आहे. सगळेच एकमेकांना 'झालं का फायनल 'असा प्रश्न विचारत आहेत.
सांगलीची जागा स्वाभिमानीला? मुंडोळ्या बाजारात, नवरादेव मंडपात!
सांगलीची जागा स्वाभिमानीला मिळाली. उमेदवार फायनल झाला, अशा रोज उठणाऱ्या अफवांमुळे काँग्रेस आणि स्वाभिमानीचे नेतेही हैराण झाले आहेत. तर, भाजपातील बंडखोर उमेदवार गोपीचंद पडळकर यांना कधी काँग्रेसमधून उमेदवारी मिळणार, तर कधी ते स्वाभिमानाचे उमेदवार होणार अशा अफवा पसरत आहेत. दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीचे नेते जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीप पाटील यांना स्वाभिमानाची उमेदवारी मिळणार अशीही चर्चा सुरू आहे. मात्र, सांगलीची जागा काँग्रेसकडे राहणार, की स्वाभिमानीला मिळणार हे अधिकृत जाहीर झाले नाही. असे असताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेने वाट्याला जागा आली, उमेदवार निश्चित झाला, हा प्रकार म्हणजे मुंडोळ्या बाजारात आणि नवरा मंडपात असा झाला आहे.
काँग्रेस नेत्यांपेक्षा कार्यकर्तेचं सांगलीच्या जागेबाबत आग्रही
दुसऱ्या बाजूला काँग्रेसच्या हक्काची जागा काँग्रेसकडेच राहिली पाहिजे यासाठी कार्यकर्ते आग्रही असल्याचे दिसत आहे. नेत्यांना मात्र याच्याशी काही देणे-घेणे नाही, अशी स्थिती आहे. तर वसंतदादा घराण्यातुन निवडणूक लढवण्यास उत्सुक का नाही? असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे. विश्वजित कदमांच्या मते वसंतदादा घराण्याने लोकसभा लढवावी, आपणाला कडेगावची विधानसभा पुरेशी आहे, अशी भूमिका जाहीर केली आहे. तर प्रतीक पाटलांनी आपणाला राजकारणात फारसा रस राहिला नाही, असे स्पष्ट करत विश्वजित कदमांची शिफारस केली आहे. आता या सर्व घडामोडीत प्रतिक पाटील यांचे बंधू विशाल पाटील यांचे नाव पुढे आले आहे. पण विशाल पाटलांना सांगलीची विधानसभा लढवून आमदार व्हायचे आहे. त्यामुळे दादा आणि कदम गटातील वादात खरे तर सांगलीच्या लोकसभेच्या जागेचा प्रश्न अडकून पडला आहे.
भाजपकडूनही कानोसा, काँग्रेस की स्वाभिमानी?
भाजपकडून संजयकाका पाटील यांची उमेदवारी फायनल झाली असून त्यांनी निवडणुकीच्या मैदानात उडीही घेतली आहे. पण समोर तगडा उमेदवार कोण असणार, तो काँग्रेसचा असेल की स्वाभिमानीचा असेल याबाबत संभ्रम असल्याने भाजपमधूनही 'फायनल झालं का' याचा कानोसा नेत्यांपासून कार्यकर्त्यांकडून घेतला जात आहे. कारण त्यावर भाजप नेत्यांची रणनीती अवलंबून आहे.