सांगली - जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या आता शून्य झाली आहे. इस्लामपूरमधील आणखी एका महिलेचा अहवाल निगेटिव्ह आला आला आहे. त्यामुळे सद्यस्थितीत जिल्ह्यातील सगळेच (२६) रूग्ण हे कोरोनामुक्त झाले आहेत. शहरातील कोरोनाबाधित मृत व्यक्तीच्या संपर्कातील १५ जणांचे अहवालही निगेटिव्ह आले आल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी दिली आहे.
सांगलीच्या इस्लामपूर येथे सौदी अरेबियातून परतलेल्या चौघांमुळे २६ जणांना कोरोना लागण झाली होती. यातील २५ जण काही दिवसांपूर्वी कोरोना मुक्त झाले होते, तर एक महिला उपचार घेत होती. सोमवारी या महिलेचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे इस्लामपूर आणि सांगली जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या आता शून्य झाली आहे.
विजयनगर येथील मृत कोरोनाबधिताचा रूग्णाशी संबंधित एकूण २७ जणांना ताब्यात घेऊन आयसोलेशनमध्ये दाखल केले होते. यातील १६ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यामध्ये मृत रूग्णाच्या कुटुंबातील ५ व्यक्ती होत्या. यापैकी आई, वडील , भाऊ आणि पत्नी यांचे अहवाल सकाळीच प्राप्त झाले होते तर रूग्णाच्या मुलाचा अहवाल सायंकाळी प्राप्त झाला. याच व्यक्तीशी संबंधित अन्य ११ जण इन्स्टिट्युशनल क्वारंटाईनमध्ये होते. त्यांचेही अहवाल निगेटीव्ह आल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांनी दिली आहे .