सांगली - शिराळा तालुक्यातील मांगले व कांदे परिसरात एका बिबट्याला जेरबंद करण्यात आले. गेल्या पंधरा दिवसापासून याठिकाणी बिबट्याचा वावर होता. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या बिबट्याने कांदे येथील एका शेतकऱ्याची गाय व मांगले येथील एका शेळीवर हल्ला केला होता. मांगले ग्रामपंचायतीने वनविभागाला या बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी सांगितले होते.
वनविभागाने पंधरा दिवसापासून बिबट्याला पकडण्यासाठी सापळा लावला होता. मात्र, बिबट्या चकवा देण्यात यशस्वी होत होता. आज पहाटे मांगले येथील शिवडीवस्तीवर सापळा लावून त्यात शेळीला बांधण्यात आले. शेळीच्या अमिषाला फसून बिबट्या सापळ्यात अडकला. बिबट्याला वनविभागाने वैद्यकीय तपासणीसाठी नेले आहे. यावेळी वनपाल देशमुख, हनुमंत पाटील, संभाजी पाटील व एस आर काळे उपस्थित होते.