सांगली - कोरोना प्रतिबंधक "कोव्ही शिल्ड" लसीकरणाला सांगली जिल्ह्यात सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात 26 हजार 500 शासकीय, निमशासकीय आणि खासगी आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात येणार आहे. इस्लामपूरमध्ये जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत लसीकरण मोहिमेचा शुभारंभ झाला आहे.
लसीकरण मोहिमेचा शुभारंभ
कोव्ही शिल्ड लसीकरण मोहिमेचा सांगली जिल्ह्यात शुभारंभ झाला आहे. सांगली जिल्ह्यातील 26 हजार 500 शासकीय, निमशासकीय आणि खासगी आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिल्या टप्प्यात लस देण्यात येणार आहे. शासनाकडून जिल्ह्यात 31 हजार 800 लस दाखल झाल्या आहेत. त्यासाठी जिल्ह्यात 9 केंद्र नियुक्त करण्यात आलेले आहेत. ग्रामीण भागात चार आणि महापालिका क्षेत्रामध्ये पाच अशा एकूण 9 केंद्रांवर लसीकरण मोहीम पार पडणार आहे.
जलसंपदा मंत्र्यांच्या उपस्थितीत लसीकरण
इस्लामपूरमध्ये जलसंपदा मंत्री जयंत पाटील, खासदार धैर्यशील माने, यांच्या उपस्थितीत लसीकरण मोहिमेचा शुभारंभ झाला आहे, यावेळी जिल्हाधिकारी अभिजित चौधरी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी उपस्थित होते. तर महापालिका क्षेत्रात सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या उपस्थितीत लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. जिल्हा प्रशासनाकडून लसीकरण मोहिमेची जय्यत तयारी करण्यात आली असून, लसीकरणादरम्यान पूर्ण खबरदारी घेतली जात असल्याचे महापालिका प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
सर्व्हरडाऊन असल्याने लसीकरणाला उशिरा सुरुवात
दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणानंतर प्रत्यक्ष लसीकरण मोहीम सुरू झाली, पण सांगलीचे शासकीय रुग्णालय त्याचबरोबर महानगरपालिकेचे हनुमान नगर येथील आरोग्य केंद्र याठिकाणी दुपारी एक वाजून 45 मिनिटांपर्यंत सर्व्हर मशीन सुरू झाली नव्हती, त्यामुळे लसीकरण ठप्प होते. अखेर 1 वाजता लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली.