सांगली - भाजपकडून गड राखला जाणार की? काँग्रेसच्या हातातून गेलेला गड स्वाभिमानी परत मिळवून देणार? की वंचित बहुजन आघाडी बाजी मारणार याबाबत सांगलीत जोरदार चर्चा रंगू लागल्या आहेत. ७० वर्षे काँग्रेस आणि ३५ वर्षे वसंतदादा पाटील यांच्या हातात सांगली लोकसभा मतदारसंघ राहिला आहे. मात्र, २०१४ मधील निवडणुकीत मोदी लाटेत सांगलीत काँग्रेसच्या बालेकिल्याला सुरुंग लावत भाजपचे संजयकाका पाटील यांनी विजय मिळवला. त्यावेळी काँग्रेसच्या प्रतीक पाटलांचा पराभव झाला होता. राष्ट्रवादीचे दिग्गज नेते तत्कालीन गृहमंत्री दिवंगत आर. आर. पाटील यांनी या निवडणुकीत प्रयत्नांची पराकाष्टा केली होती. मात्र, तरीही काँग्रेसचा गड कोणालाही शाबूत ठेवता आला नाही.
यावेळी या मतदारसंघातून पुन्हा भाजपने संजयकाका पाटील यांना तर आघाडीकडून स्वाभिमानीतर्फे विशाल पाटील हे मैदानात उतरलेत. तर वंचित बहुजन आघाडीकडून गोपीचंद पडळकर उभे राहिल्याने विशाल पाटील आणि संजयकाका पाटील यांच्यासमोर आव्हानं निर्माण झाले आहे.
गेल्या पाच वर्षात सांगली लोकसभा मतदारसंघ आणि जिल्ह्यात अनेक राजकीय बदल घडले आहेत. काँग्रेस आणि भाजपतील संघर्ष दोन्ही पक्षातील नेत्यांनी चव्हाट्यावर आणत विरोधी पक्षाबरोबर वैरत्व घेण्याऐवजी स्वकीयांचे शत्रूत्व घेतले आहे. याचा फटका भाजपचे विद्यमान खासदार संजयकाका पाटील यांच्याबरोबर काँग्रेसमधील वसंतदादा घराण्याला बसला आहे.
२०१४ ची परिस्थिती
२०१४ च्या निवडणुकीत २ वेळा सांगली लोकसभेचे नेतृत्व केलेल्या वसंतदादा घराण्यातील माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांचा भाजपच्या संजयकाका पाटील यांनी तब्बल २ लाख ३८ हजार मतांनी पराभव केला होता. या निवडणुकीच्या विजयाचे परिणाम जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघावरही झाले. ६ पैकी ४ विधानसभा मतदारसंघात ३ भाजप आणि १ शिवसेनेचे आमदार विजयी झाले. भाजपच्या या विजयी घौडदौडीमुळे जिल्ह्यातील काँग्रेस जवळपास संपुष्टात आल्याप्रमाणे झाली. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर प्रतीक पाटील यांनी मतदारसंघाशी असणारा सर्व संपर्क तोडून अघोषित संन्यास घेतला.
काँग्रेसमधील अंतर्गत कलह
काँग्रेसमध्ये सांगली लोकसभेच्या उमेदवारीवरून बराच कलह झाला होता. प्रतीक पाटील यांना उमेदवारी देण्यावरून काँग्रेसमधील वसंतदादा विरुद्ध पतंगराव कदम गटातील संघर्ष उघड झाला. या संघर्षामुळे गेली ७० वर्षे आणि त्यातील ३५ वर्षे एकहाती सांगली लोकसभा मतदारसंघावर वर्चस्व ठेवणाऱ्या दादा घराण्याचा पत्ता कट झाला. काँग्रेसने सांगलीची जागा मित्रपक्ष असणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी पक्षाला दिली.
पक्षातील नेत्यांनी थेट वरिष्ठ पातळीवर संजयकाका पाटील यांच्या उमेदवारीला विरोध केला होता. त्यामुळे पाटील यांच्या उमेदवारीवर टांगती तलवार होती. अखेर राजकीय परिस्थिती लक्षात घेऊन ऐनवेळी संजयकाका पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. पण यातून पक्षातील एकेकाळचे स्टार प्रचारक व धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी बंड केले. तर काँग्रेस आणि पर्यायाने वसंतदादा पाटील घराण्यातून सांगली लोकसभेची उमेदवारी गेल्याने वसंतदादांचे नातू विशाल पाटील यांनी बंडखोरीचा झेंडा फडकवला. मात्र, स्वाभिमानीने विशाल पाटील यांना पक्षाची उमेदवारी देत लोकसभेच्या मैदानात उतरवले.
गोपीचंद पडळकरांचे बंड
भाजपचे बंडखोर मानले जाणारे गोपीचंद पडळकर यांना स्वाभिमानीतून उमेदवारी निश्चित मानली जात असताना ऐनवेळी त्यांचा पत्ता कट झाला. त्यानंतर त्यांनी वंचित बहुजन आघाडीमधून संजयकाका पाटील आणि विशाल पाटील यांच्या विरोधात शड्डू ठोकला.
१२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात
सांगली लोकसभा मतदारसंघात भाजप, काँग्रेस महाआघाडीचे स्वाभिमानी शेतकरी पक्ष, वंचित बहुजन आघाडी, बहुजन मुक्ती पार्टी, अपक्ष असे १२ जण निवडणूक लढवत आहेत. मात्र, यामध्ये भाजप, काँग्रेस महाआघाडीतून स्वाभिमानी शेतकरी पक्ष, वंचित बहुजन आघाडी यांच्यात खरी लढत होत आहे. या तिरंगी लढतीमुळे सांगली मतदारसंघात रंगत आली आहे.
मतदारसंघातील प्रश्न
गेल्या ५ वर्षात जिल्ह्यात ठोस असा उद्योग उभा राहू शकला नाही. सांगली जिल्ह्यातील पूर्व भाग अजून दुष्काळाच्या छायेत आहे. टेंभू, ताकारी, म्हैसाळ या सिंचन योजना या जिल्ह्यासाठी वरदान मानल्या जात आहेत. मात्र, अद्याप त्या पूर्णत्वास गेल्या नाहीत. यामुळे दुष्काळी जनता अद्याप पाण्यापासून वंचित आहे. जिल्ह्यातील औद्योगिक इंडस्ट्रीजच्या विकासाचे घोंगडे अद्याप भिजत पडले आहे. यामुळे उद्योजक अडचणीत आहेत. रोजगाराचा प्रश्नही गंभीर आहे. हळद आणि द्राक्षांची आगार असणाऱ्या पेठेसंदर्भात अनेक अडचणी आहेत. व्यापाऱ्यांना सेवाकर नोटीसा हा प्रश्न केंद्र स्तरावर रेंगाळत पडला आहे, अद्याप तो सोडवला गेला नाही. शिवाय सांगली महापालिकेच्या विकासाचा मुद्दाही महत्त्वाचा आहे.
मुद्यांऐवजी आरोप-प्रत्यारोप
सांगलीत विकासाच्या मुद्यांवर बोलण्यापेक्षा सर्वच पक्ष जात, घराणेशाही, व्यक्तीगत आरोप यावर अधिक भर देत आहेत. गोपीचंद पडळकर यांच्यावर धनगर समाजाचे नेते म्हणून शिक्का मारण्यात येत आहे. तर भाजपच्या संजयकाका पाटील यांच्यावर गुंडगिरी, कारखाने बुडवले, अशी टीका करण्यात येत आहे. तर विशाल पाटील यांच्यावर घराणेशाहीची टीका होत आहे. आतापर्यंत निवडणुकीत वसंतदादा पाटील घराण्याच्या पाठीत खंजीर खुपसला, संग पहिला आता जंग पहा, गुंडगिरी मोडून काढू, घराणेशाही कशाला असे आरोप-प्रत्यारोप भाजप, स्वाभिमानी आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये सुरू आहे. जिल्ह्यात मराठा समाजाचे अधिक प्राबल्य आहे. त्या पाठोपाठ धनगर समाज, दलित समाज आणि मुस्लीम समाज त्याचबरोबर लिंगायत समाजाचेही लोकसंख्या लक्षणीय आहे.
मतदारसंघातील पक्षीय बलाबल
सांगली लोकसभा मतदारसंघात ६ विधानसभा क्षेत्रांचा समावेश होतो. यामध्ये ३ भाजपचे तर शिवसेनेचा, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा प्रत्येकी एक आमदार आहे.
मिरज - सुरेश खाडे (भाजप)
सांगली - सुधीर गाडगीळ (भाजप)
जत - विलासराव जगताप (भाजप)
खानापूर - विटा - अनिल बाबर (शिवसेना)
पलुस-कडेगांव - विश्वजीत कदम (काँग्रेस)
तासगांव-कवठे महांकाळ - सुमनताई पाटील (राष्ट्रवादी)
जिल्हा परिषद, सांगली महापालिका, तासगाव नगरपालिका आणि दोन पंचायत समित्यांमध्ये भाजपची एकहाती सत्ता आहे. असे असले जरी भाजपमध्ये जोरदार अंतर्गत कलह आहे. तूर्त पक्षीय पातळीवर हा संघर्ष मिटवण्यात आला आहे. पण तो कितपत मिटला हाही प्रश्न आहे ?
मतदारसंख्या
एकूण मतदार - १८ लाख ३ हजार
पुरुष मतदार - ९ लाख २९ हजार २३२
स्त्री मतदार - ८ लाख ७३ हजार ७४९ आहेत
१९ तृतीयपंथी मतदार आहेत.
सुरुवातील भाजपला सोपी वाटणारी निवडणूक विशाल पाटील आणि गोपीचंद पडळकर यांच्या उमेदवारीमुळे अवघड बनली आहे. भाजपला पक्षातील नाराज नेत्यांची कितपत साथ मिळते. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची स्वाभिमानीला प्रत्यक्ष किती मदत मिळते. तसेच वंचित बहुजन आघाडीचे जातीचे समीकरण आणि पडळकर यांची जादू कितपत चालते. हे येत्या २३ मे ला पाहायला मिळणार आहे. या तिरंगी लढतीमुळे सांगली लोकसभा निवडणुकीत काँटे की टक्कर होणार हे मात्र नक्की.