सांगली: एसटी चालवत असताना अचानकपणे चालकाला चक्कर आले. मात्र प्रसंगावधान ओळखून शेजारी असलेल्या कंडक्टरने बसच्या स्टेरिंगचा ताबा घेतला. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. सांगलीच्या खानापूर तालुक्यातील भिवघाटजवळ हा प्रकार घडला आहे. या घटनेत सुमारे 30 प्रवाशी बचावले आहेत.
ड्रायव्हरला अचानक चक्कर: बीडच्या परळीहुन सांगलीच्या विट्या मार्गे चिपळूणकडे 2 दिवसांपूर्वी निघालेल्या एसटी बसला अपघात होता होता वाचला आहे. खानापूरच्या भिवघाटमार्गे विट्याकडे येत असताना एसटीला चालवणाऱ्या ड्रायव्हरला अचानक चक्कर आली. चालू गाडी अचानकपणे थांबु लागली. यामुळे शेजारी बसलेल्या कंडक्टरने चालकाकडे पाहिले असता चालकाने स्टेरिंग सोडले होते, आणि डोके धरले होते. या प्रकारामुळे घाबरलेल्या कंडक्टरने धाडसाने तातडीने हाताने गाडीचा ब्रेक मारला आणि स्टेरिंग धरून गाडी थांबवली.
तब्बल ३० जणांचे प्राण वाचले: त्यानंतर अत्यावश्य अवस्था असलेल्या चालकाला त्याच बसमधून तातडीने कंडक्टरने गाडी चालवून भिवघाट येथील रुग्णालयापर्यंत घेऊन आले. त्यामुळे घटनेचे गांभीर्य ओळखून शेजारीच वाहक कम चालक असणाऱ्या कंडक्टरने बसचा ताबा घेतला आणि बस बाजूला घेतल्यामुळे, चालक- वाहकासह तब्बल ३० जणांचे प्राण वाचले आहेत.