सांगली - सांगलीमध्ये वाढीव वीज बिलासंदर्भात राज्य सरकारविरोधात भाजपाकडून आंदोलन करण्यात आले. वीजबिल फाडून सरकारचा निषेध नोंदवण्यात आला. तातडीने वीज बिलांमध्ये सवलत जाहीर करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा यावेळी देण्यात आला. तसेच ऊर्जामंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत नागरिकांनी वीजबिल भरू नये, असे आवाहन भाजपाकडून करण्यात आले.
सरकारचा निषेध
वीजवितरण कंपनीकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांना वाढीव वीजबिल पाठवण्यात आली आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. तर, नुकतेच ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी, वीजग्राहकांना दिलासा देऊ अशी भूमिका जाहीर केली होती. मात्र त्यांनी आपली भूमिका बदलत संपूर्ण वीजबिल भरावे लागेल, असे स्पष्ट केले. यावरून भाजपाने राज्यभर आघाडी सरकारच्या विरोधात आंदोलन पुकारले आहे. सांगलीमध्ये वाढीव वीजबिलांच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. शहरातील मारुती चौक याठिकाणी भाजपा आमदार सुधीर गाडगीळ यांच्या नेतृत्वात वीजबिले फाडून निषेध नोंदवण्यात आला. यावेळी सरकार आणि ऊर्जामंत्र्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच सरकारने तातडीने वीजग्राहकांना सवलत देण्याची भूमिका घ्यावी, अन्यथा यापुढील काळात भाजपा तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा यावेळी भाजपाकडून देण्यात आला.
हेही वाचा - वाढीव वीजबिलांचा मुद्दा पेटला... भाजपा कार्यकर्ते रस्त्यावर
ऊर्जामंत्री राऊत राजीनामा द्या
जनतेला शब्द देऊन तो फिरवणाऱ्या ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली. जोपर्यंत सरकारकडून वीजबिलांच्या बाबतीत भूमिका जाहीर करत नाही, तोपर्यंत नागरिकांना वीजबिल भरू नये, असे आवाहनही यावेळी करण्यात आले आहे.
हेही वाचा - 'केसीआर' मोदींच्या तालावर नाचतात; तेलंगाणा काँग्रेसची टीका