सांगली - कोरोनाने मृत्यू झाल्यानंतर त्या रुग्णाच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी आज नातेवाईक पाठ फिरवत असल्याची काही उदाहरणे पाहायला मिळत आहे. मात्र,अशाही परिस्थितीत माणुसकीचा अजून अंत झाला नाही, हे दाखवून देणारे उदाहरण सांगलीत समोर आले आहे. एका कोरोनाबाधित रुग्णाच्या नातेवाईंकांनी मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला. त्यानंतर सांगली महापालिकेच्या तीन नगरसेविकांनी पुढाकार घेऊन त्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याचा धाडसी निर्णय घेतला.
आप्तेष्टांची अग्नी संस्काराकडे पाठ !
संपूर्ण देश आज कोरोनाच्या महामारीशी लढत आहे. यामध्येही कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर अंत्यसंस्कार करण्याची परिस्थिती भयानक झाली आहे. स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करणाऱ्या कर्मचाऱ्यां व्यतिरिक्त कोणीही पुढे येत नाही. अगदी नातेवाईकही पाठ फिरवत असल्याच्या घटना समोर येत आहेत, त्यामुळे कोरोनामुळे नातेगोते या संकल्पनेचाही मृत्यू होत असल्याचे पाहायला मिळत आहे, अशा परिस्थितीत सांगली महापालिकेच्या भाजपाच्या नगरसेविका व महिला बालकल्याण सभापती गीतांजली ढेपे- पाटील, नगरसेविका सविता मदने आणि कल्पना कोळेकर या तिघींनी एका कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत देहावर अंत्यसंस्कार केले आहेत.
तिघींनी दिला अग्नी-
या तिघी नगरसेविका त्या रुग्णाची भेट घेण्यासाठी मिरजेच्या शासकीय रुग्णालयाकडे जात होत्या. मात्र तत्पूर्वी त्या रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती त्यांना मिळाली. तसेच त्याचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीकडे नेल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानंतर या तिघींनीही पंढरपुर रोडवरील स्मशानभूमीकडे जाण्याचा निर्णय घेतला. तिथे पोहोचल्या असता, त्याठिकाणी उपस्थित असणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून माहिती मिळाली की ज्या मृतदेहाचे नातेवाईक येत नाहीत, त्यांना 'टायगर ग्रूप' या सामाजिक संस्थेकडून अग्नी देण्याचे काम केले जाते. त्यावेळी या तिघींनी ज्या मृतदेहाचे नातेवाईक नाहीत, अशा संबंधित कोरोनाबाधित रुग्णांच्या मृतदेहांवर अग्निसंस्कार करण्याचा निर्णय घेतला. या तिन्ही नगरसेविकांनी तत्काळ पीपीई कीट परिधान करून कोरोनामुळे मृत्यु पावलेल्या रुग्णाच्या मृतदेहाच्या चितेल अग्नि देण्याचा विधी पार पाडला.
आता अभिमान वाटतोय नगरसेविका असल्याचा...
याबाबत नगरसेविका व महिला बालकल्याण सभापती गीतांजली ढेपे-पाटील म्हणाल्या, स्मशानभूमीत पोहोचल्यानंतर आम्हाला माहिती मिळाली की अनेक कोरोनाबाधित रुग्णांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करायला नातेवाईक पुढे येत नाहीत. तसेच मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात अनेक अडचणी येतात. ही बाब लक्षात येताच आम्ही "तिघींनी"आपण नगरसेविका म्हणून समाजात काम करताना समाजाचा देणे लागतो, या जाणीवेतून अशा मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला, ज्याचे नातेवाईकदेखील पाठ फिरवतात. मुळात म्हणजे स्मशानभूमीत जाईपर्यंत आमच्या मनात असा कोणताच विचार नव्हता, की एखाद्या कोरोनाग्रस्त मृतदेहावर आपणच अंत्यसंस्कार करावेत. मात्र, एक सामाजिक जबाबदारी म्हणून आम्ही तो अंत्यसंस्काराचा विधी पार पाडला. त्या कार्याचा आम्हाला अभिमान वाटत असल्याची भावानीही या नगरसेविकांनी यावेळी व्यक्त केल्या.
कौतुकास्पद धाडस प्रेरणा देणारे..
या कोरोनाच्या संकटात रुग्णासोबत नात्यांचाही मृत्यू होत असल्याची परिस्थिती सध्य स्थितीत पाहायला मिळत आहे. मात्र, सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून या तीन महिला नगरसेविकांनी थेट स्मशानभूमीत पोहचून अग्निसंस्कार करण्याचे कार्य धाडसी आणि कौतुकास्पद असल्याच्या प्रतिक्रिया समाजातून उमटत आहेत.