सांगली - संभाजी भिडे यांच्या शिवप्रतिष्ठान संघटनेमध्ये अखेर उभी फूट पडली आहे. निलंबन झालेले नितीन चौगुले यांनी सांगलीतून धारकऱ्यांचा मेळावा घेत नव्या संघटनेची स्थापना केली. "श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तान संस्था" या संघटनेच्या माध्यमातून आता यापुढे कार्य करणार असल्याचे जाहीर करत संभाजी भिडे गुरुजी यांच्या शिवप्रतिष्ठानसमोर एक प्रकारे आव्हान निर्माण केले आहे.
कट्टर हिंदुत्ववादी संघटना म्हणून संभाजी भिडे गुरुजी संस्थापक अध्यक्ष असणाऱ्या श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानची देशात ओळख आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून संघटनेत गृहकलह सुरू होता. यातून शिवप्रतिष्ठानचे कार्यवाहक असणारे नितीन चौगुले यांचे तडकाफडकी 5 फेब्रुवारी रोजी निलंबन करण्यात आले. निलंबनाच्या कारवाईनंतर येथील चौगुले यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. आपल्या समर्थक धारकऱ्यांना घेऊन राष्ट्रीय अध्यक्ष रावसाहेब देसाई यांच्या घरात ठाण मांडला होता. त्यानंतर संभाजी भिडे यांनाही या निलंबनाच्या कारवाईबाबत स्पष्टीकरण मागितले होते. मात्र, यावर शिवप्रतिष्ठानकडून कोणतेच उत्तर देण्यात आले नसल्याने नितीन चौगुले व समर्थक धारकऱ्यांनी राज्यातील धारकऱ्यांना चलो सांगलीची हाक दिली होती. रविवारी सांगलीमध्ये शिवभक्तांच्या मेळाव्याचे आयोजन केले होते. शहरातील डेक्कन हॉल याठिकाणी पार पडलेल्या मेळाव्याला राज्यातील शेकडो धारकऱ्यांनी उपस्थिती लावली.
आपल्या विरोधात कटकारस्थान..
या मेळाव्याच्या माध्यमातून नितीन चौगुले यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना, गेल्या वीस वर्षांपासून शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानमध्ये केलेल्या कार्याचा दाखला दिला. तसेच गेल्या काही महिन्यांपासून शिवप्रतिष्ठानमधील काही मंडळी आपल्याबाबत कटकारस्थान करत असल्याचा आरोप नितीन चौगुले यांनी केला. या मंडळींकडून संभाजी भिडे यांना आपल्याबद्दल केवळ चुकीची माहिती देऊन आपल्याबाबत गैरसमज निर्माण करण्याचा उद्योग केल्याचा आरोप चौगुले यांनी केला आहे.
अवैध कारभाराला पाठीशी !
तसेच शिवप्रतिष्ठानमधील काही लोक अवैध वाळू तस्करीचा धंदा करतात, हे लोक गुरुजींना त्यांच्या पकडलेल्या अवैध वाळूच्या गाड्या सोडवण्यासाठी अनेक वेळा तहसीलदारांपासून महसूलमंत्र्यांपर्यंत फोन आणि भेट घेण्यास भाग पाडले. तर गुरुजींची राजकारण आणि अर्थकारणापासून लांब राहण्याची भूमिका असताना शिवप्रतिष्ठानमधील एका नेत्याने पतसंस्था काढली, त्यानंतर ती बुडवली, यानंतर ठेवीदारांनी तक्रार करू नये यासाठी गुरुजींना त्यांच्या घराघरात नेऊन तक्रार करू नये, अशी विनंती करण्यासाठी हात जोडायला लावले. इतकेच नव्हे तर निवडणुकीमध्ये गुरुजींना घरोघरी मत मागण्यासाठीही हात जोडायला लावले.
भाजप-युतीसाठी होणार होते आंदोलन..
त्याचबरोबर राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन होत असताना, या मंडळींनी भाजप आणि युतीची सत्ता व्हावी, यासाठी मुंबईमध्ये मातोश्री आणि भाजपच्या कार्यालयासमोर राज्यातील धारकऱ्यांना घेऊन आंदोलन करण्याची योजना गुरुजींच्या डोक्यात घुसवली होती. मात्र, या भूमिकेवर आपण आक्षेप नोंदवला होता, असे अनेक कारभार शिवप्रतिष्ठानमधील चार ते पाच लोकांनी वेळो-वेळी केल्याचा आरोप नितीन चौगुले यांनी केला.
प्रति शिवप्रतिष्ठान स्थापन..!
तसेच आपले शक्तीप्रदर्शन संभाजी भिडे गुरुजी यांच्या विरोधातील नसून गुरुजींनी जे विचार आणि कार्य शिकवले ते यापुढेही घेऊन जाण्यासाठी राजकारण विरहित समाजाच्या वेगवेगळ्या क्षेत्रात आणि देशसेवा करण्यासाठी "श्री शिव प्रतिष्ठान युवा हिंदुस्तान संस्था" स्थापन करत असल्याची घोषणा चौगुले यांनी केली.
शिवप्रतिष्ठान समोर चौगुलेंचे आव्हान
संभाजी भिडे गुरुजी यांचा शब्द अंतिम आदेश मानणारी "श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान" संघटना अशी ओळख होती. मात्र, आता अशा या संघटनेमध्ये आता नितीन चौगुले यांनी आपल्यावर झालेल्या निलंबनाच्या कारवाईनंतर वेगळी संघटना स्थापन करत संभाजी भिडे गुरुजी यांच्या श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानसमोर एक आव्हान उभे केले आहे.