सांगली - शिवसेनेचे ज्येष्ठ नेते संजय राऊत यांनी उदयनराजे भोसले यांच्यावर टीका केली होती. याला प्रत्युत्तर देण्यासाठी उदयनराजे भोसले यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली. यानंतर कायमच हिंदुत्त्ववादी भूमिका घेणाऱया भिडे गुरूजी यांनी या वादात उडी घेतली आहे. छत्रपतींचा अपमान केल्याप्रकरणी त्यांनी सांगली बंदचे आवाहन केले. यावेळी संजय राऊत यांचा निषेध करण्यात आला.
पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना शिवाजी महाराजांशी करणे चुकीचे असल्याचे शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांनी सांगितले. तसेच उदयनराजेंबद्दल विधान करणाऱ्या खासदार संजय राऊत यांची हकालपट्टी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. यावेळी बोलताना, संबंधित आंदोलन शिवसेनेच्या विरोधात नसून विकृत संजय राऊत यांच्या विरोधात असल्याचे भिडे यांनी स्पष्ट केले.
छत्रपती उदयनराजे भोसले हे शिवाजी महारांचे वंशज असल्याचा पुरावे सेनेचे खासदार संजय राऊत यांनी मागितले होते. त्यावरून संजय राऊत यांच्या विरोधात शिवप्रतिष्ठानतर्फे आंदोलन करण्यात आले. आज शहरात बंद पुकारण्यात आला होता. याला सर्वत्र संमिश्र प्रतिसाद असल्याचे पाहायला मिळते.
राऊत यांच्या निषेधार्थ शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांच्या नेतृत्वाखाली शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर राऊत यांच्या विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी त्यांनी राऊत यांनी केलेल्या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सांगलीत...
आज सांगलीतील इस्लामपूर तालुक्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येणार आहेत. यातच शिवसेनेने शिवप्रतिष्ठानच्या बंदला विरोध दर्शवला आहे. त्या पार्श्वभूमीवर आपली भूमिका स्पष्ट करताना भिडे गुरुजी यांनी आपले आंदोलन शिवसेनेच्या विरोधात नसून विकृत संजय राऊत यांच्या विरोधात असल्याचे सांगितले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी राऊत यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.