सांगली - महापुराची स्थिती अद्यापही गंभीर आहे. तर या महापुरामध्ये राज्यातील मंत्री, लोकप्रतिनिधींची अनेक ठिकाणी असंवेदनशीलता पाहायला मिळाली. काही जणांनी केवळ पूर परिस्थितीची पाहणी करत पूरग्रस्तांची फक्त भेट घेतली. मात्र, सांगलीतील महापुरात कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी एका इमारतीच्या गॅलरीत पोहोचून दीड महिन्याच्या बाळासह तिच्या कुटुंबाची सुटका केली.
सांगलीच्या कृष्णाकाठी आणि शहरांमध्ये महापुर आल्यामुळे आजही हजारो जीव मुठीत घेऊन पुराच्या पाण्याने वेढलेल्या घरांमध्ये जगत आहेत. सुटका व्हावी यासाठी सर्व पातळींवर मदतीसाठी याचना करत आहेत. अनेकांचा संपर्क सुद्धा होत नाही. अशा या परिस्थितीत सैनिक, नौदल, एनडीआरएफ पथक, पोलीस प्रशासन आणि सामाजिक कार्यकर्ते नागरिकांना घरातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र, तरीही यंत्रणा अपुरी पडत आहे. बचावकार्यात अनेक अडथळे येत आहेत. अशात पूरात अडकून भेदरलेल्या एका कुटुंबाला बाहेर काढण्यासाठी सदाभाऊ खोत यांनी रेस्क्यु करत एका कुटुंबांची सुटका केली आहे.
सदाभाऊ खोत यांनी सांगलीच्या एका अपार्टमेंटमध्ये एका दीड महिन्याच्या बाळासह अडकलेल्या कुटुंबाला सुखरूपपणे बाहेर काढले आहे. त्या कुटुंबाच्या नांदेड येथील नातेवाईकांनी सदाभाऊ यांच्याशी संपर्क साधत परिस्थिती अत्यंत बिकट असल्याची माहिती दिली होती. त्यानंतर खोत यांनी तातडीने प्रशासनाची एक बोट घेऊन कुटुंबाची सुटका केली.