सांगली - माजी कृषी राज्य मंत्री सदाभाऊ खोत यांनी भाजपला सोडचिठ्ठी देण्याचे आणि राजू शेट्टी यांचा हात धरण्याचे संकेत दिले. त्यानंतर राजू शेट्टी यांनी खोत यांच्यावर जोरदार टीका केली होती. ज्यांचे हात आणि चारित्र्य स्वच्छ आहेत, त्यांच्याबरोबर मी काम करतो. खोत यांच्याकडे हे दोन्ही नाही, अशा शब्दात शेट्टी यांनी टीका केली होती. या टीकेवर खोत यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. 25 वर्षे माझ्यासोबत असताना काशीला जाऊन आंघोळ करत होता का? अशा शब्दात माजी कृषी राज्य मंत्री सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टींवर टीका करत प्रत्युत्तर दिले आहे.
कशामुळे रंगला शेट्टी आणि खोत यांच्यात कलगीतुरा?
भाजपाने पुणे पदवीधर निवडणुकांसाठी रयत क्रांतीला उमेदवारी दिली नाही. त्यामुळे खोत यांनी रयत क्रांतीचा स्वतंत्र उमेदवार उभा केला. तर राजू शेट्टी यांनी प्रस्थापितांची साथ सोडली तर निश्चितपणे राजू शेट्टींच्या खांद्याला खांदा लावून काम करेन असे वक्तव्य सदाभाऊ खोत यांनी केले होते.
ऑफर धुडकावत शेट्टींना साधला खोतांवर निशाणा
ज्यांचे हात आणि चारित्र्य स्वच्छ आहेत, त्यांच्याबरोबर मी काम करतो. खोत यांच्याकडे हे दोन्ही नाही, त्यामुळे पक्षात परत घेण्याचा प्रश्नच नाही. आपले अस्तित्व दाखवण्यासाठी सदाभाऊ खोत यांचा हा प्रयत्न सुरू आहे. ज्या ठिकाणी आहे, त्या ठिकाणी आणखी काहीतरी पदरात पाडून घ्यायचा प्रयत्न आहे. समिती नेमून सदाभाऊ खोत यांना हाकलून लावले आहे. कडकनाथमध्ये बुडालेल्या शेतकऱ्यांचे पैसे द्या, पुतना मावशीचे प्रेम नको, अशी प्रतिक्रिया राजू शेट्टी यांनी दिली आहे.
शेट्टींचे आमदारकीसाठी लोटांगण, हा स्वाभिमान?
राजू शेट्टी यांच्या टिकेनंतर सदाभाऊ खोत यांनीही शेट्टींवर सडकून टीका केली आहे. 2013 साली दिवाळीच्या पाडव्या दिवशी ऊस आंदोलनात शेतकऱ्यांची दोन तरुण मुले शहीद झाली होती. ज्यांनी शेतकऱ्यांना गोळ्या घातल्या त्यांच्या अंगणात आमदाराकीसाठी लोटांगण घालत गेलेत. पण त्यांना तिथे एखादया निर्वासिता प्रमाणे वागणूक दिली जाते अशी टिकाही खोत यांनी केली. राजू शेट्टी यांचे हात स्वछ आहेत, हे मला माहित आहे, पण हेच हात याआधी सदाभाऊ खोत यांच्या हातात होते. त्यावेळी तुम्ही रोज काशीला जाऊन आंघोळ करून येत होता काय ? आणि आता रोज गोमूत्राने आंघोळ करतात काय ,हे आधी त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला दाखवावे,अशा शब्दात सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टी यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.