सांगली - सांगलीच्या साखर कारखाना परिसरामध्ये कोरोनाचा रुग्ण आढळून आल्यानंतर, प्रशासनाने लक्ष्मी नगरचा परिसर कंटेन्टमेंट झोन जाहीर करत परिसराच्या सीमा सील केल्या होत्या. तसेच पालिका प्रशासनाकडून रॅपिड सर्व्हे करून बाधित व्यक्तीच्या संपर्कातील पाच जणांचे स्वॅब घेत परिसरातील एकूण 453 घरांतील 2 हजार 345 लोकांचा सर्व्हे पूर्ण केला आहे.
शनिवारी सायंकाळी सांगलीच्या लक्ष्मीनगर येथील एका व्यक्तीच्या रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला. त्यानंतर तातडीने तो सर्व परिसर कंटेन्टमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला. तर महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी तातडीने पाऊले उचलत कंटेन्टमेंट झोनच्या सीमा सील केल्या. याचबरोबर रविवार सकाळपासून परिसरात औषध फवारणीबरोबर 18 आशा वर्कर यांच्या मार्फत रॅपिड सर्व्हे सुद्धा सुरू केला होता. वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा पाटील, डॉ. वैशाली पवार, डॉ. वैभव पाटील यांच्या टीमकडून हा रॅपिड सर्व्हे करण्यात आला. ज्यामध्ये या कंटेन्टमेंट झोनच्या परिसरातील एकूण 453 घरातील 2 हजार 345 लोकांचा सर्व्हे पूर्ण करण्यात आला आहे. त्यात कोणालाही कोरोना सदृश्य किंवा सारी आयएलआयची लक्षणे आढळून आली नाहीत. तसेच कोरोना बाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या ५ जणांचे स्वॅब घेण्यात आले आहेत.
याचबरोबर या प्रतिबंधित क्षेत्रात 24 तास पोलीस आणि आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. या प्रतिबंधित क्षेत्रात जीवनावश्यक साहित्य पुरवण्यासाठी स्थानिक दुकानदार, भाजीविक्रेते यांची यादी तयार केली जात असून या सर्वांची माहिती प्रतिबंधित क्षेत्रातील लोकांना दिली जाणार आहे. नागरिकांनी काळजी घ्यावी, विनाकारण घराबाहेर पडू नये, मास्कचा वापर करावा तसेच कोणाला वैद्यकीय मदत लागल्यास आरोग्य टीमशी संपर्क साधावा, असे आवाहन आयुक्त नितीन कापडणीस यांनी केले आहे.