सांगली - आम्हाला धमकवणाऱ्यांनो, तुम्ही काय सद्दाम हुसेनची अवलाद आहात का? अशी घणाघाती टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी भाजपवर केली. भाजपकडे गेलेल्यांची अवस्था ही विंचू चावल्यासारखी असल्याच्या टीका त्यांनी भाजपच्या घटक पक्षांवर केली आहे. काँग्रेसच्या बाजूला बसण्यात आपणाला आंनद नाही, पण शेतकऱ्यांना संपवायला निघाले आहेत, त्याचे काय? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. सांगलीमध्ये आज महाआघाडीतील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रचार शुभारंभ प्रसंगी आयोजित सभेत ते बोलत होते.
या सभेत खासदार राजू शेट्टी यांनी बोलताना भाजप सरकार त्याचबरोबर भाजपच्या घटक पक्षांवर जोरदार टीकास्त्र सोडले. भाजपकडून सध्या सगळ्यांनाच धमकावण्याचे काम करण्यात येत आहे, अरे तुम्ही धमकावायला काय सद्दाम हुसेनची अवलाद आहात का? अशी घणाघाती टीका शेट्टींनी भाजप सरकारवर केली. मारुतीच्या मंदिरात मारुतीच्या बेंबीत बोट घातल्यावर विंचू चावण्याच्या गोष्टीचे उदाहरण देत भाजपकडे गेलेल्या सगळ्यांना विंचू चावला आहे. पण कोणी काही बोलत नाही आणि मला ही विंचू चावला, त्यामुळे आपण बाहेर पडलो, असा टोला भाजपतील घटक पक्षांना लगावत, भाजप सरकारला विंचूची उपमा दिली आहे.
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आपण उद्या यांच्या विरोधात बसू
तसेच साखर कारखानदारांच्या मांडीला मांडी लावून बसलोय, अशी टीका होत आहे आणि मलाही यांच्या मांडीला मांडी लावून बसण्यात आनंद नाही. पण तिकडे शेतकऱ्यांचे सगळेच संपवायला निघाले आहेत. त्याचे काय असा? सवाल करत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आपण उद्या यांच्या विरोधात मैदानात असू, अशी भूमिका शेट्टी यांनी स्पष्ट केली आहे.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून सांगली लोकसभेसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. आज सांगलीतील स्टेशन चौक याठिकानाहून विशाल पाटलांच्या प्रचाराचा नारळ काँग्रेस आघाडीतील नेते यांच्या उपस्थितीमध्ये फुटला. शुभारंभ प्रसंगी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जेष्ठ काँग्रेस नेते प्रकाश आवडे, काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम, राष्ट्रवादीच्या आमदार सुमनताई पाटील, काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील, काँग्रेस प्रभारी जिल्हाध्यक्ष मनीषा रोटे यांच्यासह काँग्रेस आघाडीतील नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना सर्वच नेत्यांनी भाजप सरकारवर आणि सांगलीच्या विद्यमान खासदारांच्यावर जोरदार टीका केली.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, गेल्या पाच वर्षात केंद्रातील नरेंद्र मोदी आणि राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारने केवळ घोषणा केल्या, शेतकऱ्यांसाठी शेकडो आणि उद्योगपतींच्यासाठी लाखो कोटींच्या केवळ घोषणा केल्या आहेत. देशात आता २७३ जागा पुन्हा भाजप सरकारला मिळणार नाहीत, सगळ्यात मोठा प्रदेश असणाऱ्या उत्तर प्रदेशात आता भाजप उमेदवार निवडून येतील अशी परिस्थिती राहिली नाही. महाराष्ट्रात तीच परिस्थिती राहील. दादा आणि बापू घराण्यातील संघर्षाबाबत बोलताना तो चाळीस वर्षाचा वाद होता आणि तो कधीच संपला आहे. आणि मी दादांचा लाडका कार्यकर्ता होतो. त्यामुळे दादा घराण्याचे आपल्याशी कसलेही वैर नाही आणि त्याचा फायदा तिसऱ्या लोकांना होता कामा नये, असे म्हणत त्यांनी दादा-बापू गटातील संघर्षावर पडदा पडल्याचे स्पष्ट केले.
भाजपचे उमेदवार संजयकाका पाटील यांच्याबद्दल बोलताना ते म्हणाले, जिल्ह्यातील काकागिरी लोकसभेनंतर बघू, असे सांगत सेना-भाजपाला धडा शिकवायला नियतीने विशाल पाटलांच्या हातात स्वाभिमानची बॅट दिली आहे. विशाल पाटील यांना विजय करण्याचे आवाहन त्यांनी सभेत केले.