सांगली - कोरोना झाल्याने होम आयसोलेशनमध्ये असलेले रूग्णदेखील रस्त्यावर फिरत असल्याचा प्रकार सांगलीमध्ये समोर आहे. अशा 274 रुग्णांसह एक हजार जणांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. त्यांच्याकडून अडीच लाख रुपयांचा दंड वसूल करून गुन्हे दाखल केले आहेत.
होमआयसोलेशनचे रूग्ण रस्त्यावर -
सांगली जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर शासनाकडून लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी सुरू आहे. असे असतानादेखील अनेक जण विनाकारण रस्त्यावर फिरत असल्याचे दिसत आहे. इतकेच नव्हे तर जे कोरोनाबाधित रूग्ण होमआयसोलेशनमध्ये उपचार घेत आहेत, तेदेखील रस्त्यावर फिरतात. या पार्श्वभूमीवर गेल्या दोन दिवसात सांगली पोलिसांनी जिल्ह्यात ठिक-ठिकाणी नाकेबंदी आणि गस्त घालून विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई केली आहे. होम आयसोलेशनमध्ये उपचार घेणारे 274 रुग्ण रस्त्यावर फिरताना आढळले आहेत. त्यांच्यावर राष्ट्रीय आपत्ती निवारण अधिनियम 2005 व कलम 51 प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.
अडीच लाखांचा दंड वसूल -
विनाकारण व विनामास्क फिरणाऱ्यांच्यावरही कारवाई करण्यात आली आहे. 700 पेक्षा अधिक जणांवर कारवाई झाली आहे. जिल्ह्यातील 19 ठिकाणी नाकेबंदी व गस्त घालत असताना ही कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये अडीच लाख रूपयांचा दंड, 895 दुचाकी आणि एक चारचाकी वाहन जप्त करण्यात आल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवड यांनी दिली.