सांगली - बहुजन क्रांती मोर्चाने पुकारलेल्या बंदला जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र, या बंदला हिंसक वळण लागले आहे. आंदोलकांकडून एका रिक्षावर दगडफेक करण्यात आली. तसेच दुकान बंद करण्यावरून आंदोलक आणि व्यापाऱ्यांमध्ये वाद झाला.
बहुजन क्रांती मोर्चाच्यावतीने केंद्र सरकारच्या नागरिकत्व सुधारणा कायदा आणि एनआरसीच्या विरोधात आज भारत बंदची हाक देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आज सांगलीमध्ये रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील सर्व व्यापार बंद आहेत. तसेच झुलेलाल चौक या ठिकाणी काही दुकाने चालू होते. मात्र, आंदोलकांनी त्याला विरोध दर्शवला. त्यामुळे आंदोलक आणि व्यापारी यांच्यामध्ये वाद झाला. त्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर वाद मिटला.
मिरजेच्या सिद्धिविनायक कॅन्सर रुग्णालयासमोर एका प्रवासी रिक्षा फोडण्यात आली आहे. तसेच काही आंदोलकांनी दगडफेक केली. यानंतर पोलिसांनी दगडफेक करणाऱ्या तरुणांना ताब्यात घेतले आहे, तर शहरातील आणखी काही भागात व्यापारी आणि आंदोलकांमध्ये किरकोळ वादाचे प्रकार घडले आहेत.