सांगली - दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी पानी फाउंडेशनच्या मदतीला सांगलीतील देहविक्री करणाऱ्या वारांगणाही धावून गेल्या आहेत. दुष्काळी तासगावच्या हातणोलीमध्ये शेकडो वारांगणांनी रखरखत्या उन्हात श्रमदान करत सामाजिक बांधीलकी जोपासली आहे.
वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांकडे हीन नजरेने बघितले जाते. अपघाताने या व्यवसायात ओढल्या गेलेल्या शेकडो महिला आज सांगलीत वास्तव्यास आहेत.
समाजातील एक दुर्लक्षित आणि हीन समजला जाणारा घटक म्हणजे "वेश्या महिला ". अपघाताने वेश्या व्यवसायात ओढल्या गेलेल्या शेकडो महिला आज सांगलीत वास्तव्यास आहेत.पण समाजाचे या घटकाकडे दुर्लक्ष असले तरी या महिलांचे मात्र समाजातील प्रत्येक गोष्टीकडे लक्ष आहे. सध्याच्या दुष्काळी परिस्थितीशी लढण्यासाठी आपले योगदान असले पाहिजे. या सामाजिक भावनेतून हातात खोरे आणि पाटी घेवून भर उन्हात दुष्काळी जनतेसाठी पाण्याचा थेंब जिरवण्यासाठी या महिला पाणी फाउंडेशनच्या श्रमदान शिबिरात राबू लागल्या. त्यावेळी अनेकांवर तोंडात बोटे घालण्याची वेळ आली.
पानी फाउंडेशनच्या 'सत्यमेव जयते वॉटर कप'स्पर्धेत तालुक्यातील हातणोली येथे जलसंधारणांसाठी हजारो हात राबत आहेत. त्याच कामातील एक भाग म्हणून आज 'आपलाही हातभार थोडाफार ' म्हणत सांगलीतील सुंदरनगरमधील तब्बल १०० वारांगणा आज आपले खरे आस्तित्तव विसरून या दुष्काळग्रस्तांच्या मदतीला धावल्या आहेत. रखरखत्या उन्हात त्या पाणी अडवण्यासाठी आपला घाम गळात होत्या. तब्बल ३ हेक्टर क्षेत्रात खांद्याला खांदा लावत शेकडो वारांगणा महिलांनी श्रमदान करत या परिसरात दोन बांध उभारले आहेत. सकाळपासून या वारांगना महिला कोणतीही तमा न बाळगता हातात पाटी-खोरे घेऊन खुदाई करत होत्या. त्यामुळे तब्बल १ लाख ८० हजार लिटर पाणी अडवले आणि जिरवले जाणार आहे. त्यामुळे वारांगणांच्या या श्रमदानामुळे हातणोली गाव पाणीदार होण्याची आशा आहे.
वारांगणांचे हे काम पाहून हातणोलीकर भारवून गेले होते. या श्रमदान मोहिमेत सहभाग घेतल्याचा आंनद वारांगणांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. प्रशासनाने या महिलांच्या योगदानाचे कौतुक केले आहे. विशेष म्हणजे चिखलगोठण येथे गेल्या वर्षी याचा वारांगणांनी श्रमदान केले होते. चिखलगोठण गाव तालुक्यात प्रथमही आले होते.