सांगली - केंद्राचे आदेश धुडकावून लावत राज्य सरकार एकप्रकारे विद्रोह करत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सरकारवर केला आहे. तसेच माझ्या दृष्टीने काँग्रेस संपलेली आहे, अशा शब्दात प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसवरही टीकाही केली. सांगलीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
तसेच महाविकास आघाडी सरकारवर बोलताना, राज्यामध्ये मराठा समाजाला आरक्षण देण्याबरोबर मुस्लीम समाजाला 5 टक्के आरक्षण देण्यात आले होते. मात्र, उच्च न्यायालयामध्ये फक्त मराठा समाजाच्या आरक्षणाला स्थगिती मिळाली. मुस्लीम समाजाला मात्र मिळाली नाही, पण धर्मनिरपेक्षतेचा डांगोरा पिटणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने मुस्लीम समाजाला आरक्षण लागू केले नाही, असा आरोप आंबडेकर यांनी केला आहे.
हात पुढे आल्यास विचार, पण काँग्रेस संपली आहे..
काँग्रेससोबत जाण्याबाबत आपण अनुकूल होतो, मात्र काँग्रेसने जागा वाटपाच्या बाबतीत योग्य निर्णय घेतला नाही. मात्र, कॉंग्रेसकडून पुन्हा हात पुढे आल्यास विचारू करू, पण माझ्या दृष्टीने काँग्रेस आता संपली आहे. आजही ते 'हॉलिडेच्या मूड'मध्ये आहेत, अशी टीका यावेळी आंबेडकर यांनी काँग्रेसवर केली.
राज्य सरकार करतंय विद्रोह..
राज्यातील महाविकास आघाडी सरकारकडून केंद्राचे आदेश पाळण्यात येत नसल्याच्या प्रश्नावरून बोलताना केंद्राचे जे कायदे किंवा आदेश असतील ते राज्य सरकारला पाळणे संविधानानुसार गरजेचे आहे. पण, राज्य सरकार आदेश धुडकावून लावत असतील तर हा विद्रोह आहे. राज्य सरकार बगावत करत असेल तर केंद्र सरकार घटनेतील तरतुदीनुसार 356 आर्टिकल लावू शकते, असे मतही आंबेडकर यांनी व्यक्त केले आहे.