सांगली - अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेल्या डाळिंब उत्पादकांना स्थानिक बाजारामध्ये गेल्या काही दिवसांपासून उच्चांकी दर मिळत आहे. आटपाडी येथील सौद्यात 551 रुपये प्रति किलो एवढा डाळिंबाला भाव मिळाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष केला.
जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील डाळिंब बागांना गतवर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठा फटका बसला.अतिवृष्टीमुळे अनेक बागा नामशेष झाल्याने डाळिंबाचे उत्पादन घटले आहे. त्यामुळे सौदे बाजारात डाळिंबाची आवक मंदावली आहे. मात्र देशांतर्गत आणि परदेशी बाजारपेठेत डाळिंबाला मोठी मागणी आहे. त्यामुळे शिल्लक डाळींब बागेतील माल सौद्यात येत आहे. या डाळिंबाला प्रचंड मागणी वाढली आहे.
डाळिंबाला मिळत आहे उच्चांकी दर...
जिल्ह्यात आटपाडी येथील बाजार समितीमध्ये एकमेव डाळींबाचे सौदे पार पडत आहेत. बाजार समितीमध्ये दाखल होणाऱ्या डाळिबांना मागणी वाढली आहे. परिणामी दरातही वाढ झाली आहे. गेल्या 1 महिन्यापासून डाळिंबांना उच्चांकी दर मिळत आहे. मंगळवारी पार पडलेल्या सौद्यात तासगाव येथील शेतकरी संदीप देशमुख यांच्या भगव्या जातीच्या डाळिंबाला 551 रुपये किलो उच्चांकी दर मिळाला आहे.
दरम्यान, एरवी शेतमालासह फळांना बाजारपेठेत पुरेसा दर मिळत नसल्याने शेतकरीवर्गातून नाराजी व्यक्त होत असते. मात्र, डाळींब उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.