सांगली - सांगली पोलिसांनी जत तालुक्यातील उमराणी या ठिकाणी एका शेतात छापा टाकून गांजा शेती उद्ध्वस्त केली आहे. यावेळी सुमारे 17 लाख 76 हजार किंमतीची 147 किलो गांजाची झाडं जप्त करण्यात आली आहेत. या प्रकरणी शेतमालकास अटक करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाकडून ही कारवाई करण्यात आली आहे.
सांगली जिल्ह्यातल्या जत तालुक्यातील उमराणी या ठिकाणी गांजाची शेती करण्यात आल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला मिळाली होती. माहितीनुसार पोलिसांनी उमराणी या ठिकाणी मल्लापा बिराजदार यांच्या शेतामध्ये छापा टाकला. यावेळी या शेतामध्ये ऊसाच्या शेतीआड गांजाची शेती करण्यात आल्याचे आढळून आले.
त्यानंतर पोलिसांनी या शेतातील सर्व गांजाची झाडे उखडून टाकत जप्त केली आहेत. सुमारे 147 किलो हे गांजाची झाडं असून, त्यांची किंमत सुमारे 17 लाख 67 हजार रुपये इतकी आहे. या गांजा शेती प्रकरणी मल्लाप्पा बिराजदार या शेतमालकास पोलिसांनी अटक केली आहे.
जत तालुक्यातल्या पूर्व भागात अनेक ठिकाणी गांजा शेती करण्यात येत असल्याचे अनेकवेळा समोर आले आहे. पोलिसांनी या विरोधात वेळोवेळी कारवाई केली आहे. मात्र, तरीही जत तालुक्यामध्ये गांजाची शेती करणे हे सुरूच असल्याचे स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या कारवाईनंतर पुन्हा एकदा समोर आले आहे.