सांगली- कवठेमहांकाळ तालुक्यातील दुधेबावी येथे एक 40 वर्ष वय असणारी पुरुष व्यक्ती 27 एप्रिल रोजी मुंबई येथून आली होती. सदर व्यक्तीला गुरुवारी फिवर क्लिनिकमध्ये तपासणीसाठी आणले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांची तपासणी केली. तपासणीनंतर त्याला मिरज येथील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. त्याचे स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठवले होते ते पॉझिटिव्ह आले आहेत.
कवठेमहांकाळ येथे केलेल्या तपासणीमध्ये या व्यक्तीची लक्षणे संशयास्पद वाटल्याने तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. डी. आर . पाटील यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांच्याशी संपर्क साधला. यानंतर त्या व्यक्तीला मिरज येथील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले. ही व्यक्ती कोरोनाबाधित ठरल्याने त्याच्या निकटवर्तीय धोकादायक संपर्क बाधितांना मिरज येथील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात येत आहे तर दुय्यम संपर्क बाधितांना कवठेमहांकाळ येथे संस्थात्मक क्वारंटाइन करण्यात येत आहे.
कोरोनाबाधित व्यक्तीचे मूळ गाव वाळवा तालुक्यातील येडेनिपाणी असून ही व्यक्ती गेली तीन वर्षांपासून येडेनिपाणी गावाला आलेले नाही. बाधित व्यक्ती ही मुंबईहून सरळ दुधेबावी येथे आपल्या मामाकडे आली होती . त्यामुळे येडेनिपाणी गावाशी कोणताही संपर्क झालेला नाही.
कामेरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉ. सुनंदा पाटील, येडेनिपाणी उपकेंद्राचे डॉ. सोमनाथ अंकोलीकर, सरपंच डॉ. सचिन पाटील कुरळप पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अरविंद काटे यांनी संबंधित रूग्णाच्या आईस भेट देऊन माहिती घेतली. सहाय्यक पोलीस निरीक्षक अरविंद काटे यांनी गावातील त्या व्यक्तीबद्दल गावातील पोलीस पाटील व घरा शेजारील लोकांकडून माहिती घेतली असता तो तीन वर्षांपासून गावात आलेला नसल्याचे सांगितले.
दुधेबावी या ठिकाणी प्रशासनामार्फत आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ४ व्यक्ती अॅक्टिव्ह कोरोनाबाधित असून त्यांच्यावर मिरज येथील विलगीकरण कक्षात उपचार सुरू आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ.अभिजित चौधरी यांनी दिली.