सांगली - सध्या ऑक्सिजनचा बेड मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे रुग्णांना आमदारांच्या दारात बेड मिळवण्यासाठी जावे लागत आहे. अशाच एका ऑक्सिजन बेडसाठी महिला रुग्णाला थेट मालवाहतूक टेम्पोतून ऑक्सिजन सिलिंडरसह आमदार सुधीर गाडगीळ यांचे कार्यालय गाठावे लागले. काही वेळात आमदार गाडगीळ यांनी 'त्या' महिला रुग्णाला ऑक्सिजन बेड उपलब्ध करून दिला.
सिलिंडर घेऊन बेडसाठी रुग्ण आमदारांच्या दारात -
सांगली जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती गंभीर बनली आहे. ऑक्सिजन बेड आणि रेमडेसिवीरचा मोठ्या प्रमाणात तुटवडा भासत आहे. सांगली शहरात या रुग्णांना ऑक्सिजनचे बेड मिळणे आता कठीण झाले आहे. मिरज तालुक्यातील खटाव येथील एका रुग्णाची प्रकृती खालावली. त्यामुळे त्याला ऑक्सिजनची गरज भासली. त्यानंतर कुटुंबाने त्यांना मालवाहतूक करणाऱ्या गाडीत झोपवून उपलब्ध झालेले एक ऑक्सिजन सिलिंडर लावून ऑक्सिजन बेडचा शोध सुरू केला. पण कुठेच बेड उपलब्ध होऊ शकला नाही. दरम्यान, रुग्णाची प्रकृती खालावत चालली होती. अखेर हतबल झालेल्या कुटुंबियांनी बेड कुठेच उपलब्ध होत नसल्याने मदतीसाठी गाडी थेट सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या कार्यालयाकडे नेली. त्यानंतर सुधीर गाडगीळ यांनी त्या रुग्णाला ऑक्सिजन बेड उपलब्ध करून दिला.
हेही वाचा- फोन टॅपिंग प्रकरणात रश्मी शुक्ला यांची मुंबई उच्च न्यायालयात धाव