सांगली - सांगलीमध्ये समस्त मुस्लिम समाजाच्या माध्यमातून कोरोना सेंटर उभारण्यात येत आहे. 120 खाटांचे रुग्णालय उभारण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. हकीम लुकमान असे, या रुग्णालयाला नाव देण्यात आले असून सर्व समाजातील गोरगरीब रुग्णांना याठिकाणी सवलतीच्या दरात उपचार मिळणार असल्याचे, समस्त मुस्लिम समाज संघटनेचे अध्यक्ष असिफ बाबा यांनी स्पष्ट केले आहे.
शहरातील जिल्हापरिषद शेजारी असणाऱ्या मोहम्मदिया उर्दू हायस्कूलमध्ये 120 खाटांचे रुग्णालय उभारले जात आहे. अद्ययावत अशा या रुग्णालयाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. 5 आयसीयू (अतिदक्षता विभाग) केअर, 45 ऑक्सिजन खाटा, 20 संशयितांसाठी यासह 50 जनरल (साधारण) खाटांची उपलब्धता याठिकाणी करण्यात येत आहे. याठिकाणी पुणे-मुंबई येथील तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक उपचारासाठी नियुक्त करण्यात आले आहे. येत्या दहा दिवसांमध्ये हे केअर सेंटर सुरू होणार असून या रुग्णालयाला "हकीम लुकमान" या प्रसिद्ध वैद्यांचे नाव देण्यात आल्याची माहिती समस्त मुस्लिम समाज संघटनेचे अध्यक्ष आसिफ बावा यांनी दिली आहे.
याठिकाणी सर्व समाजातील गोर-गरीब रुग्णांसाठी अत्यंत माफक दरात कोरोनावर उपचार करण्यात येणार आहेत. अँटीजेन, रक्त अशा अनेक तपासण्यासुद्धा या ठिकाणी असणार आहेत. देणगीच्या माध्यमातून हे रुग्णालय चालवले जाणार असल्याने समाजातील दानशूर व्यक्तीने पुढे येउन हातभार लावावा, असे आवाहनही आसिफ बावा यांनी केले आहे.
यावेळी नगरसेवक फिरोज पठाण, माजी नगरसेवक युनुस महात, आयुब बारगिर यांच्यांसह सामाजिक कार्यकर्ते आयुब पटेल, पटवेगार, लालू मिस्त्री, उमर गवंडी, शहानवाज फकीर, इम्रान शेख, जोहेब पन्हाळकर, सोहेल खाटीक मुस्लिम समाजातील आदी मान्यवर उपस्थित होते.
हेही वाचा - वाचन चळवळीकडून ऑक्सिजनसाठी मदतीचा हात; गरजू रुग्णाला मोफत मिळणार प्राणवायू