सांगली - वाळवा तालुक्यातील चंदवाडी येथील पन्नास वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला. मृत व्यक्ती हा भाजीपाला वाहतुकीचे काम करत होता. त्यामुळे गावात एकच खळबळ उडाली आहे. या मृत्यूमुळे वाळवा तालुक्यात रुग्ण संख्या एकने वाढली आहे.
चंदवाडीत कोरोनाचा शिरकाव झाल्याचे समजताच गावातील सार्वजनिक व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत. संबंधित रुग्ण चालक म्हणून काम करत होता. भाजीपाला वाहतुकीचे काम तो करीत होता. आष्टा तसेच वडगाव शहरातील अनेकांशी त्याचा संपर्क आला आहे. त्यामुळे त्याचा संपर्क शोधण्याचे बिकट आव्हान आरोग्य यंत्रणेपुढे आहे.
तालुका आरोग्य विभाग, स्थानिक प्रशासनामार्फत संबंधित कोरोनाबाधित व्यक्तिच्या संपर्कात जे जे नातेवाईक, मित्र आले आहेत, त्यांचा शोध सुरु करण्यात आला आहे. त्यांच्या कुटुंबियांचे स्वॅब तपासणीसाठी घेतले आहेत, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी साकेत पाटील यांनी दिली. संबंधित रुग्णास ताप, खोकला अशी लक्षणे दिसू लागताच त्याला मिरजेतील कोविड रुग्णालयात हलवले होते. आज त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता.