सांगली - खोळंबलेली वाहतूक सुरळीत करण्यासाठी सांगलीच्या इस्लामपूरचे नगराध्यक्ष थेट रस्त्यावर उतरले होते. अर्धा तास नगराध्यक्ष निशकात पाटील यांनी वाहतूक पोलिसांची कामगिरी बजावत पेठ-सांगली रस्त्यावर वाहतुकीची झालेली कोंडी सोडवली. नगराध्यक्ष पाटील यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
सांगलीच्या इस्लामपूर शहरातील वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. सांगलीहून पुणे-मुंबईकडे जाणारा मुख्य मार्ग हा इस्लामपूर शहरातून जातो, त्यामुळे अनेकवेळा वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण होते. शनिवारी दुपारच्या सुमारास पाऊसामुळे सांगली-पेठ मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. या वाहुतकीच्या कोंडीत निशिकांत पाटीलसुद्धा अडकले होते.
या ठिकाणी वाहतूक पोलीस कर्मचारी नसल्याने ही वाहतूक कोंडी सुटणे अवघड झाले होते. यावेळी या कोंडीत अडकलेले नगराध्यक्ष पाटील यांनी गाडीतून उतरत खोळंबलेली वाहतूक सुरळीत करण्यास सुरुवात केली. नगराध्यक्ष रस्त्यावर उतरून ठप्प वाहतूक सुरळीत करत असल्याचे पाहून अनेक जण त्यांच्या मदतीला धावून आले. अर्धा तासानंतर निशिकांत पाटील यांनी रस्त्यावर वाहतूक पोलिसांची कामगिरी बजावत वाहतूक कोंडी सुरळीत केली.
नागरिकांनी पाटील यांच्या या कामगिरीचे कौतुक करत त्यांचासोबच फोटो काढले.