सांगली - संपूर्ण जगाला कोरोनाचा विळखा पडलेले असताना महाराष्ट्रात एक गाव असे आहे, जिथे आजही कोरोना पोहचू शकला नाही. कदाचित तुम्हाला विश्वास बसणार नाही. पण हे खरं आहे. सांगलीच्या खानापूर तालुक्यातील बाणूरगड या गावात अद्याप कोरोनाचा शिरकाव होऊ शकला नाही. त्यामुळे हे गाव आजही कोरोनामुक्त गाव आहे. गावाच्या एकजुटीतेमुळे बाणूरगडकरांनी कोरोनाला वेशीवर रोखण्यात सलग दुसऱ्या वर्षी यश मिळवले आहे.
'कोरोनामुक्तीचा बाणूरगड पॅटर्न'
गावात कोरोनाला शिरकाव करू न देण्याचा चंग बाणूरगडकरांनी बांधला. त्यानुसार, गावात दक्षता समिती स्थापन करण्यात आली. या समितीच्या माध्यमातून गावकऱ्यांनी गावाच्या वेशीवर कोरोनाला आजही रोखून ठेवले आहे. त्यामुळे बाणूरगडमध्ये अद्यापही एकही कोरोना रुग्ण आढळून आला नाही. कारण याठिकाणी कोरोनाबाबत घेण्यात येणाऱ्या सर्व नियमांचे कटाक्षाने पालन केले जात आहे. अगदी मास्क लावण्यापासून बाहेरून येणाऱ्या व्यक्तीचे क्वारंटाइन, अशी प्रत्येक काळजी घेण्यात येते. या सर्व बाबींवर ग्राम दक्षता समिती करडी नजर ठेवते. यामुळे बाणूरगडला कोरोना वेढा पडू शकला नाही.
आसपासच्या गावात कोरोनाचा वेढा
जगभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. मात्र, बाणूरगडच्या आजूबाजूला असणाऱ्या गावात पहिल्या लाटेपासून कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. मात्र, बाणूरगडकरांनी आतापर्यंत कोरोनाला थारा दिला नाही. त्यामुळे कोरोनामुक्तीचा बाणूरगड पॅटर्न सगळीकडे चर्चेत आहे. या गावाचे कौतुक होत आहे.
बाणूरगडला ऐतिहासिक किनार
बाणूरगड हे 1200 लोकसंख्या असणारे गाव. सोलापूर आणि सांगली जिल्ह्याच्या वेशीवर डोंगरावर वसलेल्या या गावाला ऐतिहासिक परंपरादेखील आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यदलातील प्रसिद्ध गुप्तहेर बहिर्जी नाईक यांची समाधी याच गावात आहे. आजूबाजूला डोंगरदऱ्या आणि निसर्गाची मुक्त उधळन, अशी या गावाची स्थिती आहे. अशा या बाणूरगड गावाने एकजुटीच्या जोरावर कोरोनाला आपल्या गावात पाय ठेऊ दिला नाही. कोरोना महामारी सुरू झाल्यानंतर कोरोना नियमांचे काटेकोर पालन केल्याने हे सारे शक्य झाले आहे.
हेही वाचा - Pocket Ventilator.. या शास्त्रज्ञाने केवळ 20 दिवसांत बनवला खिशात बसणारा व्हेंटिलेटर