सांगली - राष्ट्रवादीचे नेते शरद पवार शुक्रवारी सांगली जिल्ह्यातल्या आटपाडी दौऱ्यावर येणार आहेत. अतिवृष्टीमुळे या भागात डाळिंब बागांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. मात्र अशाही परिस्थितीत तालुक्यातल्या खोंजाडवाडी येथील डाळिंब उत्पादकांनी निर्यातक्षम डाळिंबाचे उत्पादन घेतले आहे, आणि याचीच पाहणी करण्यासाठी पवार येत सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.
निर्यातक्षम डाळिंबाचे उत्पादन-
आटपाडी तालुक्यात डाळिंबांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. मात्र यंदा झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील जवळपास 80 टक्के डाळींब बागा या उद्ध्वस्त झाल्या आहेत. मात्र अशाही स्थितीमध्ये तालुक्यातल्या खोंजाडवाडी येथील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने निर्यातक्षम डाळींब उत्पादन घेतले आहे. तेल्या, बिब्या, दुष्काळ आणि अतिवृष्टी अशा अनेक संकटांवर मात करत खोंजाडवाडी येथील डाळींब उत्पादक शेतकऱ्यांनी डाळिंबाचे यंदा भरघोस आणि उत्तम दर्जाचे उत्पादन घेतले आहे.
काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचेेेेेेेे नेते शरद पवार यांच्यासमोर खोंजाडवाडी येथील शेतकऱ्यांची किमया मांडली गेली. त्यानंतर शरद पवार यांनी तेथील शेतकऱ्यांचे कौतुक केले. तसेच या निसर्गाच्या संकटाला मात देत फुलवलेल्या डाळींब बागा पाहण्याचे निश्चित केले होते. त्यानुसार शुक्रवारी 13 नोव्हेंबरला शरद पवार हे आटपाडीच्या खोंजाडवाडी
डाळींब बागांची पाहणी करण्यासाठी दाखल होत आहेत.
शरद पवार शुक्रवारी दुपारी दोन वाजता खोंजाडवाडी या ठिकाणी पोहोचणार आहेत, त्यानंतर येथील डाळींब उत्पादकांनी फुलवलेल्या डाळींब बागांची पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.