सांगली - आयाराम गयारामांना घेऊन शंभरी गाठलेल्या भाजपने आत्मचिंतन करावे. सत्तेत बसण्यापेक्षा विरोधी पक्षात बसावे, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी दिला आहे. सातारच्या जनतेने सातारी हिसका महाराष्ट्राला दाखवून दिल्याचा टोला जयंत पाटलांनी उदयनराजेंना लगावला आहे.
सांगलीच्या इस्लामपूर मतदारसंघातून जयंत पाटील विजय झाले आहेत. शिवसेनेचे उमेदवार गौरव नायकवडी आणि भाजपचे बंडखोर उमेदवार शशिकांत पाटील यांचा पराभव पाटलांनी केला. आपल्या विजयानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना जयंत पाटील यांनी भाजपच्या विजयावर आणि पक्ष सोडून गेलेल्या उमेदवारांवर निशाणा साधला.
हेही वाचा - मनसेचं आता काय होणार?
पक्षाला सोडून गेलेल्यांना आज पश्चाताप होत असेल. ते आमच्या बरोबर असते तर निवडून आले असते. त्यांना दुर्बुद्धी सुचल्याने त्यांनी पक्षाला सोडले. या शब्दांत राष्ट्रवादी सोडून जाणाऱ्या नेत्यांवर जयंत पाटील यांनी टीका केली. शरद पवार यांनी प्रयत्नांची शिकस्त केली त्यामुळे राष्ट्रवादीला चांगले यश मिळाले, असेही ते म्हणाले. उदयनराजेंना कधीच जनतेचे पाठबळ नव्हते. पवार साहेबांनी त्यांना उभे केले होते. पवार साहेबांमुळे कार्यकर्ते उदयनराजे यांच्या मागे होते, असे सातारा पोटनिवडणुकीबाबत जयंतराव पाटील बोलताना म्हणाले.