सांगली - केंद्र सरकारच्या कृषी कायद्याच्या विरोधात सांगली जिल्हा किसान संघर्ष समन्वय समितीच्या वतीने, सांगलीमध्ये आंदोलन करण्यात आले. यावेळी शेती उद्योग केंद्र सरकार बड्या कंपन्यांच्या घशात घालत असल्याचा आरोप करत, भांडवलशाहीचा विरोध म्हणून जिओच्या सीमकार्डची होळी करण्यात आली. तसेच सरकारने कायदे रद्द न केल्यास, शेतकऱ्यांच्या मृत्यूला जबाबदार धरून पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्याविरोधात गुन्हे दाखल करू असा इशाराही संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.
जिओ सीमकार्डची होळी
केंद्र सरकारच्या वतीने कृषी कायदा मंजूर करण्यात आला आहे. मात्र या कायद्यावरून शेतकरी संघटनांनी आक्रमक भूमिका घेत आंदोलन सुरू केले आहे. दिल्लीमध्ये गेल्या 17 दिवसांपासून शेतकरी आंदोलन सुरू आहे. केंद्र सरकार या आंदोलनाकडे दुर्लक्ष करून, बड्या कंपन्यांच्या फायद्यासाठी हे कायदे कायम ठेऊ इच्छित आहे. असा आरोप किसान संघर्ष समन्वय समितीकडून करण्यात आला आहे. त्यासाठी सांगलीमध्ये सोमवारी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात भांडवलशाहीला विरोध म्हणून रिलायन्स कंपनीच्या जिओ सिमकार्डची होळी करण्यात आली. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
भांडवलशाहीच्या विरोधात लढा
या आंदोलनावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे म्हणाले की, केंद्राच्या कृषी कायद्या विरोधात गेल्या 17 दिवसांपासून देशातील शेतकर्यांचे दिल्लीमध्ये आंदोलन सुरू आहे. मात्र सरकार या आंदोलनाकडे दुर्लक्ष करत आहे. कारण सरकारला शेतकऱ्यांचा नाही तर उद्योगपतींचा फायदा करायचा आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात भांडवशाहीच्या विरोधात लढा आणखी तीव्र करणार आहे. त्याची सुरुवात आजपासून झाली असून, आज आम्ही जिओ सिमकार्डची होळी केली. तसेच रिलायन्स कंपनीच्या उत्पादनावर बहिष्कार टाकत आहोत.
...अन्यथा मोदी, शाह यांच्याविरोधात गुन्हे दाखल करणार
गेल्या 17 दिवसांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. मात्र सरकार या आंदोलनाकडे दुर्लक्ष करत आहे. आतापर्यंत या आंदोलनात 11 शेतकऱ्यांचे बळी गेले आहेत. हे आंदोलन तातडीने रद्द न झाल्यास, शेतकऱ्यांच्या मृत्यूला जबाबदार धरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याविरोधात गुन्हे दाखल करू, असा इशाराही यावेळी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.