सांगली - सांगली जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा यांच्या दिरा विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. विजयनगरचे माजी सरपंच असणारे राजू कोरे यांच्याकडून एका तरुणीचा विनयभंग करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. दरम्यान याप्रकरणी शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तानच्या वतीने कोरे यांना तातडीने अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे.
माजी सरपंचाकडून तरूणीचा विनयभंग : सांगली जिल्हा परिषदेच्या भाजपा अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांचे दिर राजू कोरे यांच्या विरोधात विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. राजू कोरे हे विजयनगरचे माजी सरपंच देखील आहेत. सांगलीतील एका जाहिराती कंपनीसाठी काम करणाऱ्या तरुणीला कामाच्या निमित्ताने बोलवून तिला अश्लील मॅसेज पाठवण्याबरोबर या तरुणीला कोल्हापूर जिल्ह्यातल्या एका हॉटेलवर नेऊन तिच्याशी अश्लिल चाळे करत विनयभंग केल्याची तक्रार विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाली आहे.
अटकेच्या मागणीसाठी शिवप्रतिष्ठान युवाकडून निवेदन : दरम्यान याप्रकरणी राजु कोरे यांनी राजकीय दबाव वापरून हा प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करत शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तानच्यावतीने कोरे यांना तातडीने अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन जिल्हा पोलीस प्रमुख दीक्षित गेडाम यांना शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तानचे संस्थापक अध्यक्ष नितीन चौगुले यांच्या नेतृत्वाखाली दिले आहे. कोरे यांचा प्रकार निर्लज्जपणाचा कळस असून त्यांना तातडीने अटक करून कडक कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा हिंदुस्तानच्यावतीने देण्यात आला आहे.
हेही वाचा - Raghunath Kuchik Case : रघुनाथ कुचीक यांची डीएनए टेस्ट करा, पीडित तरुणीची मागणी