सांगली - राज्यातले हे सरकार कोरोनाच्या महालात झोपलेलं भुताटकीचं सरकार असल्याची टीका माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी केली आहे. तसेच दुध दर वाढीच्या मागणीसाठी रयत क्रांती संघटनेच्यावतीने 10 जून रोजी राज्यभर सरकारच्या विरोधात चाबूक फोड आंदोलन करणार असल्याचंही घोषणाही आमदार खोत यांनी केली आहे. ते सांगलीमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.
- हे सरकार तर कोरोनाची भुताटकी
यावेळी आमदार खोत म्हणाले, हे सरकार कोरोनाच्या महालात झोपलेलं भुताटकीचं सरकार असून, सरकार विरोधात कोणी आंदोलन करणार असेल, तर त्याला कोरोनाची भीती दाखवण्याचं काम या भुताटकी सरकारकडून करण्यात येत आहे. तसेच मराठा आरक्षणाच्या बाबतीत आता केंद्राला साकडे घालण्याचा उद्योग या सरकारकडून करण्यात येत आहे, मग दीड वर्ष तुम्ही झोपा काढत होता का? असा सवाल करत या सरकारने केंद्राऐवजी स्मशानभूमीला साकडे घातले पाहिजे, अशी टीकाही आमदार खोत यांनी केली आहे.
हेही वाचा - वांद्र्यात इमारतीचा भाग कोसळून एकाचा मृत्यू, ५ जण जखमी
- 'दुग्ध विकास विभाग बंद करा'
आज महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दुधाला आठ रुपये प्रति लिटर कमी दर मिळत आहे. राज्य सरकारच्या परिपत्रकाला सुद्धा सहकारीं आणि खासगी दूध संस्थांकडून केराची टोपली दाखवण्यात येत आहे. राज्य सरकारच्या आदेशाचा भंग होताना, मात्र दूध संस्थांच्यावर कारवाई करण्याचे काम असणारे दुग्ध विकास विभाग मात्र कारवाई करत नाही. तसेच खासगी दूध संस्थांच्यावर कारवाई करण्याचा अधिकार नसल्याचे स्पष्ट करत आहे .त्यामुळे असं दुग्ध विकास विभाग बंद केलं पाहिजे. त्याचबरोबर दुधाच्या खरेदी दरात राज्य सरकारकडून वाढ करणे गरजेचे आहे. त्यामुळे दूध दराच्या वाढीच्या मागणीसाठी येत्या 10 जून रोजी रयत क्रांती संघटनेकडून राज्य सरकारच्या विरोधात चाबूकफोड आंदोलन करण्यात येणार असून, ऊसाच्या एफआरपीप्रमाणे दुधाचा दरही राज्य सरकारने ठरवले पाहिजे, असंही आमदार खोत यांनी स्पष्ट केले आहे.
- 'पंढरीची वारी निघाली पाहिजे'
तसेच यंदाच्या पंढरपूरच्या वारीबाबत राज्य सरकारने योग्य ती भूमिका घेऊन परवानगी देणे गरजेचे आहे. कारण राज्यात सगळ्या निवडणुका जर पार पडत असतील तर पंढरीच्या वारीला काय अडचण आहे? असा सवाल करत वारकरी संप्रदायाने यंदा वारी काढण्याबाबतचा निर्णय घ्यावा, रयत क्रांती संघटना सोबत असेल, असं आमदार खोत यांनी स्पष्ट केले आहे.
हेही वाचा - अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीचा प्रियकराच्या मदतीने खून, कोरोनाने मृत्यू झाल्याचा बनाव