सांगली - नेत्यासाठी काय'पण'म्हणणाऱ्या कार्यकर्त्यांचा हृदयस्पर्शी सत्कार सोहळा पार पडला आहे. जोपर्यंत आपला नेता आमदार होत नाही, तोपर्यंत वेगवेगळे "पण"करणाऱ्या या कार्यकर्त्यांचा चांदीच्या चप्पल आणि दुचाकी देऊन सन्मान करण्यात आला आहे. आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांचा हा सन्मान सोहळा आटपाडीच्या झरे याठिकाणी पार पडला आहे.
कार्यकर्त्यांचा असाही सन्मान
सांगलीच्या आटपाडी तालुक्यातल्या झरे या ठिकाणी राजकारणातला एक हृदयस्पर्शी सोहळा पार पडला आहे. मात्र, हा सत्कार कोणा नेत्याचा नव्हता तर नेत्याकडून कार्यकर्त्यांचा होता. भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी हा सत्कार सोहळा आयोजित केला होता. पडळकर यांच्या 3 कार्यकर्त्यांनी गोपीचंद पडळकर हे आमदार व्हावेत यासाठी 'पण' केला होता. दोघा कार्यकर्त्यांनी जोपर्यंत गोपीचंद पडळकर आमदार होत नाही, तोपर्यंत चप्पल न घालण्याचा 'पण'केला होता.
आटपाडीच्या कटरेवाडी येथील गॅरेज काम करणारे दत्तात्रय कटरे यांनी 2006 पासून तर पुजारवाडी येथील वीट भट्टी कामगार नारायण पुजारी यांनी 2009 पासून चप्पल न घालण्याचा तर झरे येथील सलून व्यावसायिक कै.जालिंदर क्षीरसागर यांनी पडळकर यांच्याकडून केस, दाढीचे पैसे न घेण्याचा प्रण केला होता.
आमदाराने कार्यकर्त्यांचे धुतले पाय
अशा या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आमदार पडळकर यांनी त्यांचा जाहीर सत्कार सोहळा आयोजित केला होता. या सत्कार सोहळ्यात चप्पल न घालणाऱ्या दोन कार्यकर्त्यांना चांदीची चप्पल आणि दुचाकी प्रदान केली. तर केस व दाढीसाठी पैसे न घेणाऱ्या कुटुंबाला दुचाकी भेट देण्यात आली. माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, साताऱ्याच्या माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीमध्ये हा दिमाखदार सोहळा पार पडला. विशेष म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर यांनी स्वतःच्या हाताने कार्यकर्त्यांचे पाय धुवून त्यांच्या पायात ही चांदीची चप्पल घातली.
यावेळी आमदार सदाभाऊ खोत, आमदार जयकुमार गोरे यांनी आमदार गोपीचंद पडळकर आणि त्यांच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचे तोंडभरून कौतुक करत महाराष्ट्रातील राजकारणाला आदर्श घालणारा हा सोहळा असल्याचे मत व्यक्त केले.