सांगली - एका भंगाराच्या दुकानातून सुरू असलेल्या गांजा विक्रीचा पर्दाफाश मिरज पोलिसांनी केला आहे. याप्रकरणी दोघांना अटक करत ९ किलो गांजासह सव्वा लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
मिरज शहरातील झारीबाग येथे एका भंगारच्या दुकानात चोरून गांजाची विक्री होत असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी संदीपसिंह गिल यांच्या पथकाला मिळाली होती. या पथकाने मिळालेल्या माहितीनुसार भंगार दुकानावर छापा टाकला. यावेळी या दुकानात असणाऱ्या अस्लम बाडवाले व युनूस शेख यांना ताब्यात घेत त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी भंगार दुकानात एका कागदाच्या बंडलामध्ये गांजा ठेवल्याचे सांगितले. यावेळी पोलिसांनी कागदाचा बंडल शोधून काढला असता, त्यामध्ये ९ किलो गांजा आढळून आला आहे. त्यानंतर पोलिसांनी हा गांजा जप्त केला आहे. तसेच दोन मोटरसायकलीही जप्त केल्या असून, एकूण अंदाजे दीड लाखांचा मुद्देमाल यावेळी जप्त करत अस्लम बाडवाले व युनूस शेख यांना अटक केली आहे.
संशयितांच्या घरावरही पोलिसांना छापे टाकला, मात्र यावेळी घरात काही मिळून आले नाही. दरम्यान गांजा विक्री प्रकरणी महात्मा गांधी पोलीस ठाण्यात अस्लम बाडवाले व युनूस शेख यांच्या विरोधात गुन्हा दाखल करत हा गांजा कोठून आणला? आणखी कुठे विक्री सुरू आहे? याची तपास सुरू आहे.